उस्मानाबाद - ९३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटक पद्मश्री ना. धों. महानोर यांना 'साहित्य संमेलनाला जाऊ नका' अशी अज्ञातांकडून फोन करून धमकी देण्यात आली होती. मात्र, माझा शब्द मी पाळणार असून कुठल्याही धमकीला न घाबरता मी या साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाला जाणार असल्याचे महानोर यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना सांगितले आहे.
तेर येथे होत असलेल्या ९३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला आजपासून सुरुवात होत आहे. मात्र, या संमेलनाच्या सुरुवातीलाच गालबोट लागणे सुरू झाले होते. सुरुवातीला संमेलनाच्या अध्यक्षपदी असलेले फादर दिब्रेतो यांच्या अध्यक्षपदावरून वातावरण चिघळले होते. तर, आता ख्रिस्ती धर्मगुरू अध्यक्ष असलेल्या संमेलनाचे उद्घाटक म्हणून जाऊ नका म्हणत त्यांना धमकी देण्यात आली आहे. यावर ईटीव्ही भारतशी त्यांनी चर्चा केली.
हेही वाचा - माझी तब्येत चांगली, संमेलनाला उपस्थित राहणार - अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो
तब्येतीबाबत बोलताना महानोर म्हणाले, माझी तब्येत खराब होती मात्र आता मी ठणठणीत आहे. मी गेली कित्येक वर्ष या साहित्य संमेलनाचे उद्घाटन करतो आहे. मी नको म्हणत असतानाही मला या साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाला बोलवले असून मी शब्द दिला आहे. त्यामुळे, आता कुठल्याही धमक्यांना न घाबरता मी या उद्घाटनासाठी जाणार आहे. तसेच कुणीही घाबरलेले नसून अत्यंत उत्साहाने आणि प्रेमाने हे संमेलन पार पडणार असल्याची खात्री असल्याचे महानोर 'ईटीव्ही भारत'शी बोलताना म्हणाले.
हेही वाचा - 'साहित्य संमेलनाला जाऊ नका' संमेलनाचे उद्घाटक ना. धों. महानोर यांना धमकी