उस्मानाबाद - जिल्ह्यातील वाशी आणि लोहारा या दोन नगरपंचायतसाठी ( Nagar Panchayat Election 2021 ) आज मतदान झाले. दोन्ही नगरपंचायतमध्ये शांततेत मतदान प्रक्रीया पार पडली. थंडीमुळे मतदार घरातून उशिरा बाहेर पडले. दुपारी चार वाजेपर्यंत आलेल्या आकडेवारीनुसार 50 टक्के मतदारांनी आपले मतदानाचे हक्क बजावले.
वाशी नगरपंचायतीची स्थिती
वाशी नगरपंचायतीमध्ये ( Washi Nagar Panchayat ) शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्या उमेदवारांसह तेरा जागांसाठी एकूण 38 उमेदवार रिंगणात आहेत. नगरपंचायातीच्या हद्दीतील मतदारांची एकूण संख्या 10 हजार 680 आहे. त्यात 4 हजार 956 महिला व 5 हजार 724 पुरुष मतदारांचा समावेश आहे. एकूण 18 मतदान केंद्रांवर मतदानाची सोय करण्यात आली होती. शिवसेना-भाजप हे दोन पक्ष स्वतंत्र लढत आहेत. मात्र, दोन्ही पक्षांना सर्व जागांवर उमेदवार मिळाले नाही. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व वंचित बहुजन आघाडी हे एकत्रित निवडणूक लढत आहेत.
काँग्रेसमधून सेनेत गेलेल्या चेडे यांची प्रतिष्ठा पणाला
वाशी नगरपंचायतीत काँग्रेसमधून शिवसेनेत गेलेले प्रशांत चेडे यांची प्रतिष्ठा पणाला लागल्याचे पाहायला मिळत आहे. मागील काही वर्षांपासून प्रशांत चेडे यांचे या मतदारसंघात चांगलेच वर्चस्व राहिले आहे. त्यामुळे यंदा त्यांनी जोरदार प्रचार करत सत्ता आणण्यासाठी प्रतिष्ठा पणाला लावली आहे. प्रचारासाठी शिवसेनेकडून माजी मंत्री तथा मतदारसंघाचे विद्यमान आमदार प्राध्यापक डॉ. तानाजी सावंत, खासदार ओमराजे निंबाळकर तर राष्ट्रवादीकडून राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे, वंचित बहुजन आघाडीकडून पक्षाचे राज्य उपाध्यक्ष सर्वजीत बनसोडे त्याचबरोबर मराठवाडा उपाध्यक्ष रवींद्र रनबागुल तर भाजपकडून माजी मंत्री तथा तुळजापूर मतदारसंघाचे विद्यमान आमदार राणा जगदीशसिंह पाटील यांनी सभा गाजवल्या.
लोहारा नगरपंचायतीची स्थिती
लोहारा नगरपंचायतीत ( Lohara Nagar Panchayat ) एकूण 17 पैकी 13 जागेसाठी 44 उमेदवार रिंगणात आहे. त्यात प्रभाग क्रमांक 2 व प्रभाग क्रमांक 11 मधील अपक्ष उमेदवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना आघाडीच्या उमेदवारांना जाहीर पाठिंबा दिला आहे. दोन उमेदवारांनी इतर उमेदवारांना पाठिंबा दिल्याने खरी लढत 42 उमेदवारांमध्ये आहे. या मतदारसंघात पाच हजार 460 मतदार असून त्यांच्यासाठी 13 मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली होती.
ओबीसी वार्डा व्यतिरिक्त होत आहेत निवडणुका
प्रारंभी नगरपंचायतीच्या सर्वच्या सर्व 17 वॉर्डची आरक्षण सोडत झाली होती. नंतर ओबीसी आरक्षणाबाबत ( OBC Reservation ) झालेल्या घडामोडींमुळे चार प्रभागाचे निवडणूक रद्द झाल्या. ज्यामुळे राहिलेल्या 13 प्रभागाच्या निवडणूक होईल कि याबाबत संभ्रम होता. नंतर ओबीसी आरक्षणाच्या जागा रिक्त ठेवून इतर ठिकाणी निवडणुका घेण्याचे निश्चित झाले. त्यामुळे कमी कालावधीत प्रक्रिया आणि प्रचाराला गती मिळाल्याचे दिसून आले.
हे ही वाचा - MNS Agitation Against Toll : उस्मानाबादमध्ये सक्तीच्या टोल वसूलीवरुन मनसेने टोल नाका फोडला