उस्मानाबाद - जाती, समाजामध्ये विष कालवणाऱ्या समाजकंटकांच्या तोंडावर एक चपराकच देण्यासारखी घटना उस्मानाबादमधील कळंब येथे घडली आहे. आपल्या लहानग्या मुलाचे हट्ट पुरवण्यासाठी एका मुस्लीम कुटुंबीयांनी आपल्या घरी बाप्पाची प्रतिष्ठापना केली आहे. यामुळे परिसरात जमादार कुटुंबीयांचे कौतुक केले जात आहे.
मुळचे कोल्हापूरचे रहिवासी व सध्या कळंब येथे नायब तहसीलदार असलेले अस्लम जमादार हे डॉक्टर पत्नी अर्शिया व तीन वर्षीय मुलगा अबरार यांसह राहतात. मागील वर्षी त्यांच्या घराशेजारी राहणारे रवी व बाबळे यांनी गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना केली होती. त्यावेळी अस्लम यांचा मुलगा अबरार हा केवळ 2 वर्षांचा होता. तेव्हापासूनच त्याला बाप्पाचा लळा लागला. यंदाच्या वर्षी रवी व बाबळे हे बदलून दुसरीकडे गेले, त्यामुळे अबरार हा गणेश मूर्ती आणायला गेला नाही. मात्र, आसपासचे लोक गणेश मूर्ती आणताना त्याने पाहिले. त्यानंतर तो आई अर्शियाकडे बाप्पाच्या मूर्तीसाठी हट्ट करू लागला. याबाबत अर्शिया यांनी गस्तीवर गेलेल्या अस्लम यांना सांगितले. अस्लम यांनी मी आल्यावर बाप्पाची मूर्ती आणू असे म्हणत वेळ मारली. पण, अबरार जास्तच हट्ट करू लागला. अखेर मुलाच्या हट्टासाठी आई अर्शिया यांनी गणेश मूर्ती घरी आणत त्यांची विधीवत प्रतिष्ठापना केली.
त्यानंतर याचे फोटो अस्लम यांना व्हॉट्सअॅपद्वारे पाठवले. सुरुवातीला आपल्यात गणपती आणत नाहीत, हे मुलाला सांगावे, असे अस्लम यांना वाटले. मात्र, तो केवळ 3 वर्षांचा मुलगा आहे त्याला या जातीपाती काय समजणार आणि आपण त्याला आतापासून धर्म-जाती, रुढी-परंपरेपासून दूर ठेवू या विचाराने त्यांनीही गणेश मूर्तीची पूजा केली.
बाप्पा घरी आल्याने लहानगा अबरार हा देखील खूप आनंदी झाला आहे. त्यामुळे बाप्पासह आपल्या घरी आनंदही आल्याची प्रचिती झाल्याचे अस्लम जमादार यांनी सांगितले. यापुढे मूर्तीची प्रतिष्ठापना करणार असल्याचेही ते म्हणाले. त्यांच्या या निर्णयाने आसपासचेही खूष झाले असून, त्यांचे सर्वत्र कौतूक केले जात आहे.
हेही वाचा - ...आणि बाप्पा झाले 'त्या' मुस्लीम कुटुंबाच्या घरात विराजमान