उस्मानाबाद - दुर्दैवाने अपेक्षाभंग झाला आहे. मात्र, मी नाराज नसल्याचे आमदार तानाजी सावंत यांनी सांगितले. सावंत हे भुम, वाशी, परांडा या विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. विधानसभा निवडणुकीपूर्वी सावंत साधारण तीन महिने उस्मानाबादचे पालकमंत्री होते. 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर मी पुन्हा उस्मानाबादचा पालकमंत्री होणार असल्याचे ठामपणे आमदार सावंत सांगत होते. मात्र, सत्तास्थापनेसाठी झालेल्या नाट्य घडामोडीमुळे सावंत यांना मंत्रिमंडळातून डावलले गेले. त्यामुळे तानाजी सावंत नाराज असल्याच्या चर्चांना उधाण आले होते.
नवीन मंत्रिमंडळाच्या स्थापनेनंतर तानाजी सावंत उद्धव ठाकरे यांच्यासोबतच्या औरंगाबाद येथे झालेल्या बैठकीत सहभागी झाले नसल्याने व इतर कार्यक्रमात गैरहजर असल्याने सावंत नाराज असल्याचे बोलले जात होते. मात्र, आज तानाजी सावंत यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की दुर्दैवाने अपेक्षाभंग झाला आहे. मात्र, मी नाराज नाही असे सांगत उद्धव ठाकरे उस्मानाबाद जिल्ह्याला लवकरच न्याय देतील कारण उस्मानाबादने शिवसेनेसाठी भरपूर काही दिले आहे. त्यामुळे लवकरच उद्धव ठाकरे योग्य तो निर्णय घेतील असा विश्वास तानाजी सावंत यांनी व्यक्त केला आहे.