उस्मानाबाद- सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर राज्यभर याचे पडसाद उमटत असताना दिसत आहेत. या स्थगितीचा निषेध करण्यासाठी मराठा समाज पुन्हा रस्त्यावर उतरला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील मुरूम शहरात मराठा क्रांती मोर्च्याकडून 'जागरण गोंधळ आंदोलन' करण्यात आले.
मराठा आरक्षणाला मिळालेल्या स्थगितीसाठी कोर्टामध्ये केंद्र आणि राज्य सरकारने मराठा समाजाच्या बाजूने भक्कमपणे उभे राहावे, अन्यथा राज्यभर आणखी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा मराठा क्रांती मोर्चाने दिला आहे. चार वर्षांपूर्वी तत्कालीन राज्य सरकारच्या विरोधात आरक्षण मिळवण्यासाठी मराठा समाजाने तब्बल 52 मुक मोर्चे काढत आंदोलन केले होते. हे आरक्षण मिळवण्यासाठी मराठा समाजातील काही युवकांनी आत्महत्या केल्याचे प्रकार देखील घडले होते. आता पुन्हा आंदोलनाचा भडका उडण्याची शक्यता असून या 'जागरण गोंधळ आंदोलनात' केंद्र आणि राज्य सरकारच्या विरोधात आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली.