उस्मानाबाद - मराठा क्रांती मोर्च्याचे तिसरे पर्व सुरू झाले असून, आरक्षणासाठी मराठा समाज आता आक्रमक होण्याच्या मार्गावर आहे. याच अनुषंगाने मराठा समाजाच्यावतीने आज भाजप आणि शिवसेना यांच्या संपर्क कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले.
या दोन्ही पक्ष कार्यालयासमोर ढोल वाजवून हे आंदोलन केले. त्याचबरोबर भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील, शिवसेना आमदार कैलास पाटील आणि शिवसेना खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांचा निषेध करत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
तसेच मराठा क्रांती मोर्चाच्या वेगवेगळ्या मागण्यांचे निवेदन भाजप आमदार आणि शिवसेना आमदार, खासदार यांना देण्यात आले. त्याचबरोबर सर्व राजकीय पक्षांनी राजकारण न करता हा आरक्षणाचा प्रश्न सोडवावा. अन्यथा पुढचे आंदोलन आता ठोक स्वरूपात केले जाणार असून, यासंबंधी सर्व जबाबदारी ही शासनाची असल्याचा इशारा आंदोलनकर्त्यांनी केला.