उस्मानाबाद - केंद्र सरकारने मंजूर केलेला कृषी कायदा रद्द करण्यात यावा, या मागणीसाठी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी आज भारत बंदचे आवाहन करण्यात आले. यासाठी आखिल भारतीय संघर्ष समितीने पुकारलेल्या आंदोलनाला उस्मानाबाद शहर आणि जिल्ह्यात मोठा प्रतिसाद मिळाला.
भारतीय जनता पक्षाव्यतिरिक्त सर्वपक्षीय नेत्यांनी आंदोलनात सहभाग घेत कडकडीत बंद पाळला. केंद्र सरकारने कोणालाही विचारात न घेता कृषी कायदा लागू केला आहे, असे म्हणत या कायद्याविरोधात शेतकरी रस्त्यावर उतरले असून त्यास पाठिंबा देण्यासाठी उस्मानाबाद जिल्हा जन आंदोलन संघर्ष समितीच्या वतीने शहर आणि जिल्ह्यात कडकडीत बंद पाळण्यात आला.
दूध, भाजीपाला व मेडिकल आदी जीवनावश्यक सेवा वगळता सर्व बाजारपेठ अद्याप बंद आहे. रिक्षा, खासगी वाहतूक देखील बंद असून शाळा - महाविद्यालय बंद ठेवण्यात आली. बंदच्या दरम्यान, राष्ट्रवादी, शिवसेना, काँग्रेस, शेकाप आदी पक्षाचे कार्यकर्ते एकत्र येऊन छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून बंद करण्यासाठी समर्थन रॉली काढण्यात आली. या राष्ट्रवादी काँग्रेसचे जीवन गोरे, डॉ. प्रताप पाटील, शेकापचे धनंजय पाटील यांच्यासह इतर नेत्यांनी सहभाग घेतला.