धाराशिव Sri Tuljabhavani missing jewellery : तुळजापूर येथील तुळजाभवानीचा गायब झालेला सोन्याचा मुकुट सापडला असल्याचा दावा सोने मोजणी समिती सदस्य आणि पूजारी मंडळाचे अध्यक्ष अमरराजे कदम यांनी केलाय. तसंच तुळजाभवानी मंदिरातील पितळी पेटीत हा मुकुट सापल्याची माहिती मिळली आहे. 826 ग्रॅम वजनाचा सोन्याचा मुकुट गायब झाला असल्याचं मोजणी समितीच्या अहवालात सांगण्यात आलं होतं. मात्र, तोच मुकुट आता सापडल्याचा दावा कदम यांच्याकडून करण्यात आलाय. दरम्यान, या प्रकरणावरुन आता पुजारी मंडळाचे माजी अध्यक्ष किशोर गंगणे यांनी तुळजाभवानीच्या गायब झालेल्या दागिन्यांची उच्च न्यायालयाच्या खंडपीठामार्फत चौकशी करावी, अशी मागणी केली आहे.
काय म्हणाले किशोर गंगणे : या संदर्भात बोलत असताना किशोर गंगणे म्हणाले की, श्री तुळजाभवानीचा नुसता मुकुट नाही तर असे अनेक दागिने गायब झाले आहेत. काल मंदिर संस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बसे हे मुकुट गायब झाल्याच्या प्रकरणात गुन्ह्याची नोंद करणार होते. परंतु, गुन्हा दाखल व्हायच्या आत मुकुट कसा सापडला? या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यासाठीही गेल्या तीन महिन्यांपासून टाळाटाळ करण्यात आली. या काळात ओम्बसे यांनीही चुप्पी साधली होती. त्यामुळं एकूणच मंदिर संस्थानचा कारभारच चुकीच्या पद्धतीनं चालू आहे, असा आरोप होतोय.
पुढं ते म्हणाले की, श्री तुळजाभवानीचा मुकुट गायब झाल्याच्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी 16 जणांची समिती नियुक्त करण्यात आली होती. तसंच संस्थानात वेगवेगळ्या चार समित्या आहेत, असं असताना या चौकशीवेळी हे सगळे आंधळे झाले होते का? आणि आता अचानक पितळी पेटी कुठून आली? त्यामुळं या सर्व प्रकरणाची उच्च न्यायालयाच्या खंडपीठामार्फत चौकशी करावी. हे सगळं अधिकाऱ्यांना वाचवण्यासाठी चाललंय, यातील बहुतांश वस्तू अधिकाऱ्यांनी लाटल्या असल्याचा संशयही गंगणे यांनी व्यक्त केला.
काय आहे प्रकरण : 2009 ते 2023 या कालावधीमध्ये तुळजाभवानीला भाविकांनी वाहिलेलं सोनं, चांदी आणि मौल्यवान वस्तूंची मोजदाद काही दिवसांपूर्वी मंदिर संस्थानकडून करण्यात आली होती. त्यामध्ये 27 अलंकारांपैकी 4 अलंकार गायब असल्याचं निदर्शनास आलं. त्यामध्ये 12 पदराच्या 11 पुतळ्या असलेलं मंगळसूत्र, 826 ग्रॅम वजनाचा सोन्याचा मुकुटही गायब झाला होता. ही चोरी लपवण्यासाठी दुसरा मुकूट ठेवण्यात आल्याचंही बोललं जात होतं. त्याचबरोबर पुरातन खोडे (पादुका) काढून नवे बसवण्यात आल्याचंही सांगण्यात आलं होतं. तसंच मंगळसूत्र, नेत्रजोड आणि माणिक मोतीसुध्दा गहाळ आहेत, अशी माहिती समोर आली होती. मात्र त्यापैकी आता 826 ग्रॅम वजनाचा सोन्याचा मुकुट सापडल्याचा दावा कदम यांच्याकडून करण्यात आलाय.
हेही वाचा -
- Tulajbhavani Temple Gold Ornaments Melt : तुळजाभवानी मंदिरातील दागिने वितळवण्यास परवानगी; कसे वितळवणार दागिने?
- Mahadev Jankar : तुळजाभवानी मंदिराच्या गाभाऱ्यात जाण्यापासून रोखल्यानं महादेव जानकर संतापले; पाहा व्हिडिओ
- Tulja Bhavani Temple : तुळजाभवानी मंदिर संस्थानचा ड्रेस कोडवरून यु टर्न; भाविकांना कोणतेही निर्बंध नाहीत