उस्मानाबाद - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केलेल्या वृक्ष लागवडीच्या संकल्पाला राज्यभरातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. मात्र, उस्मानाबाद एसटी बस आगाराने या संकल्पाला हरताळ फासला आहे. उस्मानाबाद एसटी आगाराला ३३ कोटी वृक्ष लागवडी पैकी फक्त ३० झाडे लावण्याचे उद्दिष्ट होते, मात्र सर्व झाडे आगारप्रमुख यांच्या दालनासमोर अस्ताव्यस्त पडली असल्याचे चित्र आहे.
सर्व झाडे आगारप्रमुख संतोष घाणे यांच्या दालनासमोर पडली असून, यातील बहुतांश झाडे जागीच वाळून जात आहे. काही झाडांची मुळे उघडी पडली आहेत. या झाडांच्या बुडाची माती बाजूला पडून झाडांचे नुकसान होत आहे. त्यामुळे उस्मानाबाद एसटी आगाराला दिलेली झाडे अधिकाऱ्यांच्या दालनासमोर फेकण्यासाठी दिली आहेत का ? असा प्रश्न पडतो आहे.
विभागीय अभियंत्यांचा अहवाल खोटा..?
विभागीय अभियंता यांनी वनविभागाला दिलेल्या अहवालात उस्मानाबाद आगाराला तीस झाडांची उद्दिष्ट असल्याचे सांगितले आहे. तर याच आगाराने ३० झाडांपेक्षा दुप्पट , म्हणजेच ६० झाडे लावली असल्याचे वन विभागाला दिलेल्या अहवालात सांगितले आहे. तसा अहवाल ११ जुलै रोजी वन विभागाकडे देण्यात आला आहे. जिल्ह्यातील तुळजापूर, लोहारा, उस्मानाबाद, उमरगा, वाशी, परंडा, भूम अशा एकूण १५ आगारांना १८५० झाडांची लागवड करण्याचे उद्दिष्ट होते. मात्र उस्मानाबाद आगारात आगार प्रमुख संतोष घाणे यांच्या दालनासमोर अस्ताव्यस्त पडलेली झाडे पाहिल्यानंतर विभागीय अभियंत्यांनी वनविभागाला दिलेला अहवाल कितपत खरा मानायचा असा प्रश्न पडतो आहे.
आगार प्रमुखांचे उर्मट उत्तर
या अस्ताव्यस्त पडलेल्या झाडांसंबंधी आगार प्रमुख संतोष घाणे यांच्याशी 'ईटीव्ही भारत' ने संपर्क साधला. यावेळी त्यांनी कॅमेऱ्यासमोर बोलण्यास नकार दिला. आम्ही झाडे लावली आहेत आणि जी झाडे लावली आहेत, तेच तुम्ही पहा. तिथे पडलेल्या झाडांचे व्हिडिओ तुम्ही कोणाला विचारून घेतलात? मला विचारायचे, असे म्हणत लावलेल्या झाडांचे व्हिडिओ घ्या, अशा पद्धतीची उर्मट उत्तरे संतोष घाणे यांनी दिले.