उस्मानाबाद - उन्हाळ्यानंतर पावसाळा सुरू होताच जलजन्य आजारांचे प्रमाण वाढते नागरिकांमध्ये डेंगू, मलेरिया, टायफॉईड असे आजार उद्भवतात. या पार्श्वभूमीवर 'वातावरणातील बदलामुळे नागरिकांनी सावध राहून स्वतःची काळजी घेण्याची गरज आहे.' अशी सुचना उस्मानाबाद जिल्हा रूग्णालयाचे शल्यचिकित्सक डॉक्टर राज गलांडे यांनी केली.
वातावरणातील बदलामुळे मागील पाच-सहा वर्षापासून देशासह राज्याला सतावणारा 'स्वाइन फ्लू' पुन्हा येऊ शकतो अशी शक्यताही डॉक्टर राज गलांडे यांनी व्यक्त केली आहे. सध्या जिल्ह्यातील ग्रामीण रुग्णालयांमध्ये डेंग्यूचे रुग्ण तुरळक असून मलेरियाच्या रुग्णांची संख्या नगण्य असल्याचे डॉक्टर राज गलांडे यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना सांगितले.
'स्वाइन फ्लू' होवू नये यासाठी शासनाबरोबरच जिल्हा आरोग्य प्रशासन तयार आहे. याची लस जिल्हा रुग्णालयात उपलब्ध असून ज्यांना दम्याचा आजार, डायबिटीज, श्वसनाचे आजार, गरोदर माता, वयस्कर व्यक्ती जे विविध आजारांनी त्रस्त असतात. ज्यांची प्रतिकारशक्ती कमी झालेली आहे त्यांनी काळजी घेतली पाहीजे.
'स्वाइन फ्लू' होऊ नये म्हणून घ्यावयाची काळजी
- 'स्वाइन फ्लू' होऊ नये म्हणून लस घेणे आवश्यक आहे.
- पावसाळ्याच्या दिवसात असे संसर्गजन्य आजार उद्भवतात त्यामुळे असे आजार होऊ नयेत म्हणून; शुद्ध पाणी प्यावे.
- परिसराची स्वच्छता नागरिकांनी राखली पाहिजे.
- गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळले पाहिजे.