उस्मानाबाद - शहर पोलीस स्टेशनच्या वतीने बकरी ईदनिमित्त पोलीस निरीक्षक उमाशंकर कस्तुरे यांच्या मार्गदर्शनाखाली शांतता कमिटीची बैठक पार पडली. या बैठकीत हिंदू आणि मुस्लिम धर्माचे नागरिक हजर होते. या बैठकी दरम्यान, हिंदू-मुस्लीम ऐक्याचं प्रतीक म्हणून पोलिस प्रशासनाच्या वतीने प्रयत्न करण्यात आले असून श्रावण सोमवार असल्यामुळे बकरी ईदचे बलीदान मंगळवारी देण्याचे सर्वसंमतीने मंजुर करण्यात आले आहे.
सध्या हिंदू धर्मीयांसाठी पवित्र असलेला श्रावण महिना सुरू आहे. या महिन्यातला प्रत्येक सोमवार हिंदू धर्मियांसाठी महत्वाचा असतो. पण येत्या सोमवारी मुस्लिम धर्मीयांसाठी महत्वाची समजली जाणारी बकरी ईद देखील आहे. या दिवशी बलीदान देण्यात येते. ते एकाच दिवशी येत असल्याने धार्मीक भावना बाधीत होण्याची भीती व्यक्त केली जात होती.
मात्र या वर्षी हिंदू - मुस्लीम ऐक्याचे प्रतीक म्हणून पोलीस प्रशासनाच्या वतीने प्रयत्न करण्यात आले असून सोमवारी मुस्लिम धर्मीयांनी बकरी ईद साजरी करावी. मात्र बकरीचे दिले जानारे बलिदान टाळून ते मंगळवारी किंवा बुधवारी देण्यात यावे, असा प्रस्ताव ठेवण्यात आला होता.
त्याच अनुषंगाने मुस्लिम धर्मीयांच्या वतीने या शांतता कमिटीच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे की, सोमवारी बकरी ईद निमित्त कुठल्याही प्रकारची बलीदान न देता बकरी ईद साजरी करण्यात येईल. या बैठकीस शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक उमाशंकर कस्तुरे, पोलीस उपनिरीक्षक जाधव, तसेच मुस्लिम समाजातील उस्मान कुरेशी पठाण, मैनोदीन खलिफा कुरेशी, इस्माईल कुरेशी इस्माईल शेख, अब्बास कुरेशी, सिद्धिकी कुरेशी, मंनान कुरेशी, संजय वाघमारे आदींसह मुस्लिम समाजातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते