उस्मानाबाद- मंगळवारी पहाटेच्या सुमारास गुप्त माहितीवरून उमरगा पोलिसांनी ( Omerga Police Gutkha seize ) गुटख्याचा ट्रक पकडला आहे. याचा पंचनामा बुधवारी अन्न सुरक्षा अधिकारी यांनी केला. यात अर्ध्या कोटी रुपयांचा गुटखा व मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपी ट्रक ड्रायव्हरला अटक केली असून या प्रकरणी उमरगा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी कि, सोमवारी रात्री पोलीस उपनिरिक्षक रमाकांत शिंदे ( API Ramakant Shinde ) हे आपल्या सहकाऱ्यासह रात्री गस्तीस होते. यावेळी पोलिसांना गुप्त माहिती मिळाली की गुलबर्गा येथून एक गुटखा भरलेला ट्रक अहमदाबादला जात आहे. लागलीच उपनिरिक्षक शिंदे यांनी सापळा रचून उमरगा आळंद रस्त्यावर कदेर - पाटीजवळ सदर संशयित ट्रक थांबवून पाहणी केली असता सदर ट्रक चालकाने ट्रकमध्ये सुगंधी सुपारी गुटखा ( Omerga Police Gutkha action ) असल्याचे सांगितले.
चौकशीकरिता गुटखा असलेला ट्रक पोलिसांनी ताब्यात घेतला. बुधवारी सकाळी अन्न सुरक्षा अधिकारी एन.टी. मुजावर यांनी आपले सहकारी नमुना सहाय्यक तुकाराम अकोसकर, चालक नाना गाढवे यासह सदर ट्रकची तपासणी केली असता त्यात 'नजर' ९०००० हा गुटखा मिळून आला. ३६० पोत्यामध्ये अर्धाकोट चा मुद्देमाल मिळून आला. याप्रकरणी ट्रक ड्रायव्हर मो. रियाज बाबुमिया सौदागर वय ३० रा. बिदर याला अटक केली आहे.
या अधिकाऱ्यांचा कारवाईत सहभाग- ही कार्यवाही जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी ( SP Atul Kulkarni ) , अतिरिक्त पोलीस प्रमुख नवनीत कॉवत, पोलीस उपविभागीय अधिकारी रमेश बरकते, पोलीस निरीक्षक मनोज राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरिक्षक रमाकांत शिंदे, पोलीस कर्मचारी लक्ष्मण शिंदे, विष्णू मुंडे, चालक गौतम गायकवाड यांच्या पथकाने केली आहे.