उस्मानाबाद - जिल्ह्यात द्राक्षबागा उद्धस्त करणारी टोळी सक्रिय झाल्याचे समोर आले आहे. या टोळीने आतापर्यंत 5 ते 6 शेतकऱ्यांच्या द्राक्षांच्या उभ्या असलेल्या बागा उध्वस्त केल्या आहेत. या प्रकारामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
उस्मानाबाद हा दुष्काळग्रस्त जिल्हा आहे. याठिकाणी द्राक्षबागेची शेती केली जाते. गारपीट आणि अवकाळी वावटळीचा या द्राक्ष बागांना धोका असतो. मात्र, यासोबत आणखी एक संकट येथील शेतकऱ्यांसमोर उभे ठाकले आहे. येथील द्राक्ष बागांमध्ये अज्ञात टोळी द्राक्ष बागच्या उद्धवस्त करत असल्याचे समोर आले आहे. कटरच्या सहाय्याने द्राक्षाची झाडे कापून संपूर्ण भाग उध्वस्त केली जात आहे. यामुळे अवघ्या मिनिटात या द्राक्षबागा उद्धस्त होत आहेत.
हेही वाचा - उस्मानाबादेत शिवसेनेला धक्का, अजित पिंगळेंचा भाजपमध्ये प्रवेश
सुमन खैरे (रा. सोनेगाव शिवार, ता. भूम) यांची 2 एकरात द्राक्ष बाग आहे. त्याबागेत देखील या टोळीने हैदोस घातला. त्यांच्या बागेतील 600 झाडांची तार कापून ही द्राक्ष बाग जमीनदोस्त केली आहे. या प्रकारामुळे सुमन बाई अक्षरश: रडकुंडीस आल्या आहेत. ही टोळी गेली अनेक दिवसांपासून जिल्ह्यात सक्रिय आहे. रात्री शेतात कोणी नसल्याचा फायदा घेऊन ती टोळी हे कृत्य करत आहे. सुरुवातीला तुळजापूरमधील बागा उद्धस्त झाल्या आणि आता ही टोळी भूम तालुक्यात हैदोस घालत आहे. गेली अनेक दिवसांपासून या घटना घडत आहेत. मात्र, पोलिसांना अद्याप कुठलाही सुगावा लागलेला नाही. यामुळे द्राक्ष बागायतदार पुरते धास्तावले आहेत.