उस्मानाबाद - आज या दशकातील शेवटचे कंकणाकृती सूर्यग्रहण दिसले. भारताच्या काही भागात कंकणाकृती ग्रहण दिसले तर, काही ठिकाणी खंडग्रास दिसले. या सूर्यग्रहणाच्या पार्श्वभूमीवर आज तुळजाभवानी देवीची विधीवत पूजाकरून तिला पांढऱ्या सोवळ्यात ठेवण्यात आले होते.
आज पहाटे साडेचार पाचच्या दरम्यान निंबाळकर दरवाजा उघडल्यानंतर देवीला उठवण्यात आले. तुळजाभवानीचे निर्माल्य विसर्जित करून देवीचा अभिषेक व पूजा आरती करण्यात आली. त्यानंतर सूर्यग्रहणाच्या कालावधीत देवीला पांढऱ्या सोवळ्यामध्ये ठेवण्यात आले. सूर्यग्रहण संपल्यानंतर देवीला पंचामृत स्नान घालून पुन्हा वस्त्र व अलंकार घालण्यात आले.
कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे गेल्या तीन महिन्यांपासून सर्व मंदिरे बंद ठेवण्यात आली होती. लॉकडाऊनमध्ये काही प्रमाणात शिथिलता देण्यात आल्यानंतर काही धार्मिक स्थळे उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र, तुळजाभवानी देवीचे मंदिर अद्याप बंदच ठेवण्यात आले आहे. त्यामुळे मंदिरात भक्तांविनाच पूजा-अर्चा केली जात आहे.