उस्मानाबाद - तालुक्यातील पाडोळी गावात काही दिवसांपूर्वी कोरोनाबाधित रुग्ण आढळून आला. त्यामुळे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी या गावाला भेट दिली. मात्र, या भेटीदरम्यान रुग्णांचा नातेसंबंधात असलेल्या तसेच जिल्हा परिषदेच्या माजी आरोग्य सभापती आणि जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्षांनी हजेरी लावली होती.
विशेष म्हणजे याच भेटीत गावातील उपकेंद्राचे वैद्यकीय अधिकारीदेखील उपस्थित असल्याने आरोग्य विभाग जनजागृती करत आहे की नाही, असा प्रश्न गावकऱ्यांना पडत आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. ग्रामीण भागातही रुग्ण वाढत असल्याचे चित्र आहे. लोकप्रतिनिधी दायित्वाच्या भूमिकेतून गाव भेटी देत आहेत. मात्र, या भेटीदरम्यान मोठी गर्दी होत असल्याने कोरोनाचा संसर्ग वाढण्याची भीती गावकऱ्यांमधून व्यक्त केली जात आहे.