उस्मानाबाद - मनाई आदेश असताना आंदोलन केल्याचा ठपका ठेवत, अध्यात्मिक आघाडी आणि भाजपाच्या काही कार्यकर्त्यांवर तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांकडून जिल्ह्यात विविध मनाई आदेश लागू करण्यात आले आहेत. आंदोलनालादेखील मनाई आहे. मनाई असताना आंदोलन केल्याने गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
मंदिरे उघडण्यासाठी अध्यात्मिक आघाडीच्यावतीने गुरुवारपासून आंदोलनाला सुरुवात करण्यात आली आहे. तुळजाभवानी मंदिरासमोर मंदिरे उघडण्यासाठी आंदोलन करण्यात आले. जोपर्यंत मंदिरे उघडणार नाहीत, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील, असे अध्यात्मिक आघाडीचे तुषार भोसले यांनी सांगितले. मात्र या आंदोलनाला परवानगी नसल्यामुळे तुळजापूर पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक सुशीलकुमार चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीवरून 9 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशाल रोजकरी, आनंद कंदले, विनोद गंगणे, इंद्रजीत साळुंखे, अविनाश गंगणे, नितीन काळे, संतोष बोबडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.