उस्मानाबाद - कोरोनामुळे अनेकांचे अर्थकारण बिघडले आहे. यामध्ये शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची पेरणीची लगबग सुरू झाली आहे. असे असले तरी नवीन पीककर्ज काढण्यासाठी लागणारे कागदपत्रे गोळा करता करता शेतकऱ्यांना नाकी नऊ येत आहेत. त्यातच पीककर्ज घेण्यासाठी बँकाकडे सादर करण्यात येणाऱ्या कागदपत्रांमध्ये स्टॅम्प देण बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र सध्या स्टॅम्प उपलब्ध होत नसल्यामुळे जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांमध्ये पीककर्जापासून वंचित राहण्याची भीती निर्माण झाली आहे.
गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे बळीराजा सुखावला आहे. त्यामुळे पेरणीसाठी वापसा होण्याची वाट शेतकरी पाहत आहेत. कोरोनामुळे अर्थकारण बिघडल्याने शेतकऱ्यांसमोर पीककर्ज घेण्याशिवाय पर्याय उरला नाही. यासाठी अनेक शेतकरी सध्या तहसील आणि बॅंकांमध्ये गर्दी करताना दिसत आहेत. पीककर्ज घेण्यासाठी फेरफार नक्कलसह स्टॅम्प देण बंधनकारक करण्यात आले आहे.
लॉकडाउनमुळे स्टॅम्पची उपलब्धता होत नसल्याने शेतकऱ्यांना इतर जिल्ह्यातून ज्यादा पैसे देऊन स्टॅम्प खरेदी करावी लागत आहे. तसेच शेतकऱ्यांना बॅंकेच्या दारात सतत चकरा माराव्या लागत आहेत. ज्या शेतकऱ्यांनी पूर्वी पीककर्ज घेतले आहे, त्या शेतकऱ्यांनी यापूर्वी बॅंकाकडे सादर केलेल्या कागदपत्राच्या आधारेच बॅंकांनी नवीन पीककर्ज द्यावे, अशी मागणी शेतकरी करत आहेत.