उस्मानाबाद - कोरोनाने जगभरात थैमान घातले आहे. देशातही कोरोनाच्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. अशात अनेक मोठ्या उद्योगांबरोबरच शेतकऱ्यांचेदेखील अतोनात नुकसान झाले आहे. आधी अवकाळी पाऊस आणि आता लॉकडाऊनमुळे शेतकऱ्यांचे कंबरडेच मोडले आहे. तुळजापूर तालुक्यातील देवसिंगा (तूळ) येथील शेतकऱ्याच्या आठ एकर क्षेत्रावरील टोमॅटोचा शेतातच चिखल झाला आहे.
शेतकऱ्याने मोठा खर्च करून आठ एकरात टोमॅटोची लागवड केली होती. मात्र, लॉकडाऊनच्या काळात विक्री अभावी सर्व माल जागेवरच सडून गेला. त्यामुळे, शेतकऱ्याचे तब्बल पन्नास लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. टोमॅटो बरोबरच इतर सात एकर क्षेत्रावर ढोबळी मिरची लागवड केली. मात्र, मिरचीदेखील झाडावर सडून चालली आहे.
कधी ओला दुष्काळ, कधी कोरोडा दुष्काळ तर कधी गारपिटीने बळीराजा आधीच हैराण झाला आहे. अशात आता कोरोनामुळे शेतकरी पुरता डबघाईला आला आहे. आता शेतातील खराब टोमॅटो बांधावर काढण्यासाठी जवळपास ४० ते ४५ हजार रुपये खर्च येणार आहे. त्यामुळे, हा खर्च करायचा कसा, असा प्रश्न बळीराजासमोर उभा ठाकला आहे.