उस्मानाबाद - जिल्ह्यातील दुष्काळ दिवसेंदिवस गंभीर स्वरूप धारण करत आहे. जनावरांना चारा नसल्यामुळे शेतकरी कमी किंमतीमध्ये आपली जनावरे विकत आहेत. जिल्ह्यातील चारा संपल्याने कडब्याची मागणी वाढली आहे. त्यामुळे कडब्याचे भाव २ ते ४ हजार रुपये शेकडा झाले आहेत. परिणामी एवढा महाग चारा घेऊन जनावरे जगवण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. त्यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणावर जनावरे विकत आहेत.
यंदा पावसाळी हंगामात सरासरीपेक्षा ३०-४० टक्के कमी पाऊस झाला. त्याबरोरच परतीच्या पावसाने पाठ फिरवल्याने जिल्ह्यात दुष्काळच्या झळा अधिक जाणवत आहेत. फेब्रवारी महिन्यापासून पाणीटंचाईला सुरुवात झाली आहे. संपूर्ण जिल्ह्यात ५० टँकरने पाणी पुरवले जाते. त्यामुळे माणसांच्या पाण्याबरोबर जनावरांच्या पाण्याचा प्रश्नही भेडसावत आहे.
ओला चारा शिल्लक नसल्याने जनावरांची उपासमार होत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील आठवडी बाजाराबरोबर जनावरांचे बाजारही फुलत आहेत. बाजारपेठेत व्यापारी अधिक आणि ग्राहक कमी अशी परस्थिती पहायला मिळत आहे. जिल्ह्यातील आठही तालुक्यात जनावरांचा बाजार भरतो. या बाजारात १ लाख रुपयांना मिळणारी बैलजोडी आता फक्त ६० हजार रुपयांना मिळत आहे. तर ८ ते १० हजार रुपयांची शेळी ७ हजार रुपयांत शेतकऱ्यांना विकावी लागत आहे. या ठिकाणी आर्थिक आणि चाऱ्याच्या अडचणीमुळे जनावरे विकण्यासाठी शेतकरी बाजारात येत आहेत. मात्र, जनावरे खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांनी पाठ फिरवली आहे.