उस्मानाबाद- स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. नितळी येथील जय लक्ष्मी शुगर म्हणजे आत्ताचा शीला अतुल शुगर साखर कारखान्याने बिल थकल्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हाधिकारी डॉ. दीपा मुधोळ मुंडे यांच्या दालनासमोरच ठिय्या आंदोलन करण्यात आले. जोपर्यंत निर्णय लागत नाही, तोपर्यंत आम्ही येथून उठणार नाही, असा पवित्रा शेतकऱ्यांनी यावेळी घेतला होता.
शीला अतुल शुगर साखर कारखान्याने गेल्या 4-5 वर्षांपासून लातूर, बीड आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे ऊस बिले थकवली आहेत. जवळपास साडे सात कोटी रुपयांची ही रक्कम असून अद्यापही शेतकऱ्यांना ही रक्कम दिली नाही.
यासाठी वेळोवेळी आंदोलने करण्यात आली. मात्र, कोणीच याची दखल नसल्याने शेतकऱ्यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी ठिय्या आंदोलन केले. यावेळी शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात सोबत आणलेली चटणी-भाकरी खावून कारखान्याचा निषेध केला. या आंदोलनानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी मंगळवारी बैठक घेऊ, असे आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.