उस्मानाबाद- उमरगा तालुक्यातील कोंडजीगड येथील शेतकऱ्याने जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांच्याकडे आत्मदहनाची परवानगी मागितली आहे. शेताच्या शेजारी असलेल्या शेतकऱ्याच्या सततच्या होणाऱ्या त्रासामुळे आणि प्रशासनातील निष्क्रिय अधिकाऱ्याकडून सहकार्य मिळत नसल्यामुळे त्यांनी अशा प्रकारे आत्मदहनाचा इशारा देत त्यासाठीची परवानगी पीडित शेतकऱ्याने मागितली आहे. दयानंद माडजे असे त्या शेतकऱ्याचे नाव आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी या विषयाकडे लक्ष देवून संबधीत शेतकऱ्याला न्याय देतील का? याकडे माडजे यांचे लक्ष आहे.
कार्यवाही कागदावरच-
मागील तीन वर्षांपासून दयानंद माडजे यांच्या शेताशेजारील शेतकरी आबाराव हरिबा माडजे व त्यांचे दोन मुले दत्तात्रय व दिगंबर यांनी माडजे यांच्या शेतातील बांध फोडून माती काढून नेली आहे. त्यामुळे या ठिकाणी मोठा खड्डा पडल्याने जमिनीचे मोठे नुकसान झाले आहे. यासंदर्भात मंडळ अधिकारी यांनी पंचनामे करून त्याबाबतचे अहवालही प्रशासनाकडे सादर केले आहे. त्याचप्रमाणे संबंधितांना सूचना देवून दंडाची नोटीस बजावली आहे, परंतु अद्यापही कार्यवाही कागदावरच राहिली.
जमीन विक्री करण्यास प्रवृत्त-
या प्रकरणात प्रशासनातील महसूल अधिकाऱ्याला संगनमत करून शेताशेजारचे लोक अन्याय करत आहेत, असा आरोप दयानंद माडजे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या तक्रारी निवेदनात केला आहे. शेतीला जाताना रस्ता अडवणे आणि दमबाजी करून मारहाण करणे, शिवीगाळ करून जमीन विकून जाण्यास प्रवृत्त करत असल्याचा आरोप माडजे यांनी केला. माझ्या अर्जाची दखल घेवून संबधितावर कारवाई करावेत, अशी मागणी त्यांनी केली आहे. तसेच याबाबत न्याय नाही मिळाल्यास 26 जानेवारीला आत्मदहन करून स्वतःला संपवणार असल्याचा इशारा देखील लेखी निवेदनात दिला आहे.