उस्मानाबाद - कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन पुणे-मुंबई किंवा इतर जिल्ह्यातून आलेल्या लोकांना गावपातळीवर जिल्हा परिषदेच्या शाळेत विलगीकृत करण्यात येत आहे. या विलगीकरणाला अनेकजण चांगला प्रतिसाद देत असून आपण शाळेत 14 दिवस राहिलो याची जाणीव ठेऊन कनगरा येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत 14 दिवस विलगीकृत राहिल्याची परतफेड म्हणून बळीराम कोंडिबा लाड (लोहार) यांनी 10 हजार रुपयांची मदत शाळेला केली आहे.
विलगीकरण केलेल्या सर्वांना विलगीकरण कक्षात सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या व योग्य ती काळजी घेण्यात आली होती. शाळेत विलगीकृत असताना लाड (लोहार) यांनी शाळेतील मैदानाची स्वच्छता केली, त्याचबरोबर त्यांचा विलगीकरण कक्षातील 14 दिवसाचा कालावधी पूर्ण होताच शाळेच्या विकास कामासाठी लाड (लोहार) यांनी कुटुंबाकडून 10 हजाराची मदत शाळेचे मुख्याद्यापक बी. के. लोहार यांच्याकडे सुपूर्द केली.
अनेक ठिकाणी विलगीकृत केलेल्या लोकांची काळजी घेतली जात नसल्याच्या तक्ररी समोर आल्या होत्या. मात्र, लाड कुटुंबाने शाळेची स्वच्छता करून शाळेलाही आर्थिक मदत केली.