उस्मानाबाद - आमच्या मागण्या मान्य करा, अन्यथा इच्छा मरणाची परवानगी द्या, अशी मागणी निवेदनाद्वारे कंत्राटी वीज कामगारांनी केली. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले. विविध प्रश्नांसाठी वीज कंत्राटी कर्मचारी कृती समितीच्या वतीने बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे.
महावितरण कंपनीच्या मंजूर रिक्त जागांवर १० ते १५ वर्षांपासून काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांची नियुक्ती करून त्यांना न्याय द्यावा. तसेच भरतीमधील पात्रता निकष बदलून १०वीच्या मेरिटनुसार गुणवत्ता ग्राह्य न धरता त्या उद्योगातील आयटीआयच्या गुणांनुसार मेरिट लावावे. तसेच अनुभवी कंत्राटी कामगारांना वयाच्या ५८ वर्षांपर्यंत रोजगार द्यावा, या मागण्यांसाठी हे आंदोलन केले. महाराष्ट्र वीज कंत्राटी संघ संलग्न भारतीय मजदूर संघ, तांत्रिक अप्रेटिंस, कंत्राटी कामगार असोसिएशन, महाराष्ट्र बाह्यस्रोत वीज कंत्राटी संघटना अशा संघटनांनी एकत्र येत हे आंदोलन सुरू केले आहे.
दरम्यान, राज्यात सध्या सर्वत्र वाढीव वीज बिलांच्या विरोधात आंदोलने करण्यात येत आहेत. सर्वसामान्यांपासून राजकारण्यांपर्यंत अनेकांना वाढीव बिले आल्याच्या तक्रारी येत आहेत.
हेही वाचा - 'एल्गार' प्रकरणात पुण्यातील आणखी तिघांना एनआयएने केली अटक