उस्मानाबाद - ऑनलाईन सातबारा उतार्यांचे काम अर्धवट राहिल्यामुळे तूर विक्री नोंदणीत अडचणी येत आहेत. शेतकर्यांचा माल हमी भावाने खरेदीसाठी महाराष्ट्र स्टेट को. ऑप. मार्केटींग फेडरेशनच्या माध्यमातून तूर खरेदी केली जात आहे. तूर खरेदीसाठी जिल्ह्यात १ जानेवारीपासून ऑनलाईन पद्धतीने नोंदणी सुरू झाली आहे. मात्र, आत्तापर्यंत फक्त १ हजार ५८३ शेतकर्यांनी तूर विक्रीसाठी नोंदणी केली आहे.
राज्यातील शेतकर्यांच्या शेती उत्पादक मालाला हमीभाव मिळावा. यासाठी शेतीमाल खरेदी केंद्र सुरु करण्यात आली आहेत. ही खरेदी केंद्र उस्मानाबाद जिल्ह्यात जिल्हा मार्केटींग अधिकाऱ्यांच्या नियंत्रणाखाली सुरु करण्यात आली आहेत. उस्मानाबाद जिल्ह्यात उस्मानाबाद, नळदुर्ग, भूम, वाशी, लोहारा, गुंजोटी, कानेगाव, ढोकी, तुळजापूर, कळंब येथे तूर खरेदी केंद्र सुरु करण्यात आली आहेत.
उस्मानाबाद केंद्रावर २३३, भूम केंद्रावर २९२, लोहारा केंद्रावर ६३, गुंजोटी केंद्रावर ६४०, कानेगाव केंद्रावर ३८, ढोकी केंद्रावर ५७, कळंब केंद्रावर २६० शेतकर्यांनी नोंदणी केली आहे. तर तुळजापूर तालुक्यातील तुळजापूर आणि नळदुर्ग या दोन केंद्रावर एकाही शेतकर्यांनी तूर विक्रीबाबत नोंदणी केलेली नाही.
जिल्ह्यात ऑनलाईन सातबारा उतार्यांचे काम सुरु असल्याने ऑनलाईन पिक पेरा असलेले सातबारे उतारे शेतकर्यांना मिळणे कठीण झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांना हमीभाव केंद्रावर तूर विक्रीसाठीची नोंदणी करण्यात अडचणी येत आहेत. याबाबत जिल्हा मार्केटींग फेडरेशनचे विवेक इंगळे यांनी जिल्हाधिकारी आणि तहसीलदार यांना देखील हस्तलिखीत सातबारे देण्यात यावे याबाबत पत्रव्यवहार केला आहे.
हमीभाव केंद्रामार्फत २०१७ व २०१८-१९ मध्ये खरेदी केलेले पिके
२०१७- १८ या वर्षी
तूर - 1 लाख 55 हजार क्विंटल
उडीद - 34 हजार 685 क्विंटल
मूग- 874 क्विंटल
हरबरा - 1 लाख 87 हजार 226 क्विंटल
२०१८-१९
तूर - 15 हजार 85 क्विंटल
उडीद - 4 हजार 750 क्विंटल
मूग - 8 हजार 865 क्विंटल
हरबरा - 15 हजार 74 क्विंटल