उस्मानाबाद - तुळजापूर येथील भूमी अभिलेख कार्यालयातील उपाधीक्षकाने सॅनिटायझर पिऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी तुळजापूर पोलीस ठाण्यात ३ कर्मचाऱ्यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पंडित डोईफोडे असे आत्महत्या केलेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे.
वेळोवेळी मानसिक त्रास
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तुळजापूर येथील भूमी अभिलेख कार्यालयातील कर्मचारी एस. एन. सूर्यवंशी, एस. एस. ढोले, ए. ए. माने यांनी खोट्या सह्यांची बनावट कागदपत्रे, फेरफार आदी कार्यालयीन कागदपत्र बनवली होती. यावरून कार्यालय प्रमुख उप-अधीक्षक पंडित डोईफोडे यांनी या तिघांविरूद्ध पोलीस पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. हे तीन कर्मचारी पंडित डोईफोडे यांना वेळोवेळी मानसिक त्रास देत होते. त्यांच्या या त्रासास कंटाळून डोईफोडे यांनी तुळजापूर येथील राहत्या घरी आत्महत्या केली आहे. याबाबतची तक्रार पंडित डोईफोडे यांचा भाऊ मारुती डोईफोडे यांनी दिली आहे. त्यावरून तुळजापूर पोलीस ठाण्यात भा. दं. सं. कलम - 306, 34अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.