उस्मानाबाद - लोहारा तालुक्यातील वडगाव गांजा येथे पावसाने कहर केला असून या शिवारातील जवळपास दोनशे एकर शेतातील माती वाहून गेली आहे. त्यामुळे या शिवाराला दलदलीचे स्वरूप आले आहे.
या शिवारात चार ते पाच फूट खोल काळीभोर माती होती, मात्र त्याच शिवारात आता फक्त दगड-गोटे आणि वाळूच शिल्लक राहिली आहे. पूर्वी उपजाऊ असलेल्या जमिनीमध्ये यापुढे आता कुठलेही उत्पन्न शेतकऱ्यांना घेता येणार नाही. शेताची झालेली झालेली हानी कधीही भरून निघणारी नाही. यातील माती गेल्याने पुढचे दहा ते पंधरा वर्षे ही शेती वाळवंटासारखी राहणार आहे. त्यामुळे या शेतावर अवलंबून असणारे कुटुंब आता रस्त्यावर आले असून पावसाने शेतातील पिके वाहून गेले असते, तर पुढच्या हंगामात कष्ट करून पुन्हा ही हानी भरून काढण्याचा प्रयत्न केला असता, मात्र शेतातील माती वाहून गेल्याने आता काय करावे, या विवंचनेत शेतकरी आहेत.