उस्मानाबाद- कोरोना विषाणू महामारीच्या प्रदीर्घ काळानंतर आता कोरोनालसीच्या ड्राय रनला सुरुवात झाली आहे. कोरोना विषाणूची लस कधी येते याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले होते. आता प्रतीक्षा संपली आहे, देशभरात आजपासून लसीच्य ड्राय रनला सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर उस्मानाबाद जिल्ह्यातील तीन रुग्णालयामध्ये आज ड्राय रन मोहीम राबवण्यात आली आहे.
पहिल्या टप्प्यात 9 हजार जणांना कोरोना लस
उस्मानाबाद जिल्हा रुग्णालय, सस्तुर येथील स्पर्श रुग्णालय आणि जेवळी येथील रुग्णालयात कोरोना लसीची ड्राय रन घेण्यात आली. तीन रुग्णालय मिळून एकूण यासाठी 75 जणांची निवड करण्यात आली होती. त्यांना प्रत्यक्षात लस देण्यात आली नसून, आज फक्त लसीकरण कसे करण्यात येणार आहे, याचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. केंद्रावर पोहोचल्यानंतर प्रथम तापमानाची नोंद घेणे, ऑक्सिजनची लेव्हल तपासणे, त्यानंतर प्रतीक्षा कक्षात व्यक्तीला थांबवणे, नंतर या व्यक्तीचे लसीकरण करने आणि लसीकरण केलेल्या व्यक्तीला अर्धातास निरीक्षणात ठेवणे अशा पद्धतीने हे ड्राय रन पार पडले. जिल्ह्यात सुरुवातीच्या टप्प्यात 9 हजार वैद्यकीय कर्मचाऱ्यांना ही कोरोनाची लस मिळणार आहे. अशी माहिती उस्मानाबादचे जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी दिली आहे.