उस्मानाबाद - जिह्यात काँग्रेस-राष्ट्रवादीचा सुपडा साफ झाला आहे. चारही मतदारसंघात शिवसेना-भाजपचे उमेदवार विजयी झाले आहेत. तुळजापूर मतदारसंघातून भाजपचे राणाजगजितसिंह पाटील हे विजयी झाले आहेत. त्यांनी काँग्रेसचे जेष्ट नेते मधुकर चव्हाण यांचा 23 हजार 169 मतांनी पराभव केला. शिवसेनेच्या तानाजी सावंतांनी राष्ट्रवादीच्या मोटेंचा पराभव केला आहे.
जिल्ह्यातील जेष्ट नेते पद्मसिंह पाटील यांचे पुत्र राणाजगजितसिंह पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे तर शिवसेनेचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्यावर झालेला हल्ल्यामुळे हा जिल्हा चर्चेत राहिला होता.
उस्मानाबादमधून शिवसेनेचे कैलास पाटील विजयी झाले आहेत. तर उमरग्यातून शिवसेनेचे ज्ञानराज चौगुले यांनी आपला गाड राखला आहे. चौगुले यांनी काँग्रेसचे दिलीप भालेराव यांचा 25 हजार 137 मतांनी पराभव केला. गेली तीन टर्म आमदार असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राहुल मोटे हे परंडा मतदारसंघातुन पराभूत झाले आहेत. शिवसेनेचे तानाजी सावंत परांडा मतदार संघातून 32912 मतांनी विजयी झाले आहेत.
काँग्रेसचे जेष्ट नेते मधुकर चव्हाण हे तुळजापूर मतदारसंघातुन चार वेळेस आमदार म्हणुन निवडून आले होते. मात्र, यावेळी त्यांना पराभवाला सामोरे लागले.