उस्मानाबाद - कंपनीने लॉकडाऊन काळात वेतन न दिल्याने तामलवाडीतील दोन कामगारांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अंगावर रॉकेल ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला. यावेळी कर्तव्यावरील पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने पुढील अनर्थ टळला. या कामगारांवर पुढील कारवाई सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक सतीश चव्हाण यांनी दिली आहे.
तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी औद्योगिक वसाहतीतील कंपनीने लॉकडाऊन काळात वेतन दिले नाही. त्याचबरोबर कोरोना विषाणू संसर्ग वाढू नये, यासाठी अन्य कोणत्याही सुविधा दिल्या नाहीत. त्यामुळे कामगारांची उपासमार होत असून या कंपनीच्या विरोधात दोन कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अंगावर रॉकेल ओतून घेत आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. यावेळी उपस्थित असलेल्या पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत त्या कामगाराकडून रॉकेलचा डबा हिसकावून घेतला. तर उर्वरित कामगारांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले. यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला.
या आंदोलनप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांना आंदोलनकर्ते अंबादास गायकवाड यांनी 70 कर्मचाऱ्यांना अनुसरून निवेदन दिले आहे. शासनाच्या नियमाप्रमाणे ज्या काही अत्यावश्यक सुविधा असतील त्या सर्व कर्मचाऱ्यांना देण्यात याव्यात, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे.