उस्मानाबाद - जिल्ह्यात सध्या प्रचंड पाणीटंचाई आहे. यासोबत आता नारळाच्या पाण्याची टंचाईदेखील जाणवू लागली आहे. केरळ आणि कर्नाटक राज्यात पडणाऱ्या पावसामुळे ही टंचाई भासू लागली आहे.
वजन कमी करण्यासाठी, उच्च रक्तदाब कमी करण्यासाठी नारळाच्या पाण्याला जास्त मागणी असते. त्याचबरोबर रुग्णालाही नारळाचे पाणी दिले जाते. नारळाचे पाणी आरोग्यासाठी खूपच फायदेशीर असते. मात्र, सध्या सुरू असलेल्या पावसामुळे शहाळांची टंचाई भासू लागली आहे. कर्नाटक, केरळ राज्यात सध्या पाऊस सुरू आहे. पाऊस पडल्यानंतर झाडावर चढणे अवघड होते. त्यामुळे नारळ काढता येत नाही. याचा परिणाम शहाळ्याच्या उत्पादनावर होत आहे.
उस्मानाबादमध्ये ८ दिवसाला कमीत कमी दोन ट्रक शहाळे येतात. शहरातील अप्पा चांदणे हे शहाळ्याचे होलसेल व्यापारी आहेत. त्यांच्याकडूनच इतर ठिकाणी शहाळे विकली जातात. तर आज घडीला चांदणे यांच्याकडे फक्त १०० शहाळे शिल्लक आहेत. त्यामुळे जर उद्या नारळाचा ट्रक आला नाही तर रुग्ण आणि शहाळे शौकिनांची नारळाच्या पाण्यासाठी पंचाईत होण्याची स्थिती आहे.