उस्मानाबाद - उमरगा तालुक्यातील बोरी गावामधील शेतकऱ्याची सोयाबीनची गंजी पेटवून देण्याचा प्रकार घडला आहे. अज्ञात समाजकंटकांने दगडू नाजीम शेख यांच्या शेतातील काढणी करून ठेवण्यात आलेले सोयाबीन पेटवून दिले. दगडू शेख यांची दोन एकर जमीन असून त्यांनी 45 किलो सोयाबीनची पेरणी केली होती.
पीक चांगले आले होते, पावसाने उघडीप दिल्यानंतर शेतातील सोयाबीनची काढणी देखील केली. मात्र मागील काही दिवसांत पावसाने जोरदार हजेरी लावली होती. त्यामुळे शेतात सोयाबीन भरडण्यासाठी मशीन घेऊन जाता येत नसल्यामुळे सोयाबीनचा ढिगारा करून शेतातच ठेवण्यात आला. काल संध्याकाळी दगडू शेख यांची आई शेतातून घरी आली. त्यानंतर शेतात कोणीच नसल्याचा फायदा घेत अज्ञाताने सोयाबीनच्या गंजीला आग लावली. त्यामुळे संपूर्ण सोयाबीनची गंजी जळून राख झाली आहे. यात शेतकऱ्याचे जवळपास 50 हजार रुपयांचे नुकसान झाले. याप्रकरणी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध तक्रार देण्यात आली आहे.