उस्मानाबाद - बळीराजा चेतना अभियानांतर्गत पुस्तक खरेदीत झालेल्या भ्रष्टाचार प्रकरणात दोषींवर कडक, कायदेशीर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आज (सोमवारी) आंदोलन करण्यात आले. वेगवेगळ्या गाण्यांच्या माध्यमातून जागर करत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे आंदोलन करण्यात आले.
सव्वा सहा कोटी रुपयांचा घोटाळा प्रकरणी चौकशी समितीने उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, कृषी अधिकारी यांच्यासह अन्य बारा जणांना नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत. उस्मानाबाद जिल्हा दुष्काळी असल्याने शासनाकडून अनेक योजना जाहीर केल्या जातात. बळीराजा चेतना अभियान हा त्याचाच एक भाग आहे. गेल्या सहा वर्षात या योजनेच्या माध्यमातून कोट्यवधीची रक्कम जिल्हास्तरावर आली होती. यातील सव्वा सहा कोटी रुपयांची पुस्तके छापण्याचा ठेका पुण्यातील एका खाजगी कंपनीला दिल्याचे सांगितले जात होते.
हेही वाचा - लय भारी! 'या' आजीबाई बोलतात अस्खलित इंग्रजी, पाहा व्हिडिओ
मात्र, प्रत्यक्षात जिल्ह्यात एकही पुस्तक दाखल झाले नसल्यामुळे यात भ्रष्टाचार झाल्याचा संशय व्यक्त केला जात होता. याप्रकरणी, आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलन पुकारले आहे. जिल्ह्यात झालेला भ्रष्टाचार गाण्याच्या माध्यमातून जिल्हाधिकारी कार्यालय समोर मांडला जातो आहे.