उस्मानाबाद - जिल्ह्यामध्ये आज तब्बल दोन वर्षांनंतर 600 पेक्षा जास्त शाळांमध्ये सव्वा लाखांच्यावर चिमुकल्यांची किलबिलाट ऐकायला मिळणार ( Osmanabad School Start ) आहे. त्यामुळे विद्यार्थी शिक्षक आणि पालकांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. मागील दोन वर्षांपासून कोरोनाच्या संकटामुळे शाळा बंद होत्या. संसर्ग कमी झाल्यानंतर म्हणजेच ऑक्टोबर महिन्यात शहरी भागात आठवी ते बारावी तर ग्रामीण भागात पाचवी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यात आले होते. आता गाम्रीण भागातील 1 ते 4 शाळांनाही परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे या शाळांमध्ये पुन्हा किलबिलाट ऐकायला ( school start today in osmanabad ) मिळत आहे. याबाबतचा हा आढावा....
शिक्षकांनी गुलाबाचे फुल देऊन केले विद्यार्थ्यांचे स्वागत -
जवळपास दीड वर्षानंतर शासनाने पहिलीपासून वर्ग सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. आज सकाळी नेहमीप्रमाणे प्रार्थनाने शाळेला सुरु झाल्या. कळंब येथील विद्याभवन प्राथमिक शाळेत शिक्षकांनी गुलाबाचे फुल देऊन विद्यार्थ्यांचे शाळेत स्वागत केले. यादरम्यान विद्यार्थ्यांचे आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता.
मागील दोन वर्षांपासून विद्यार्थी घरीच -
जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडून शाळा सुरू करण्याबाबत तयारी देखील करण्यात आली असून जिल्ह्यातील सुमारे सव्वा सहाशेवर शाळातील वर्ग भरणार आहेत. या वर्गातील विद्यार्थ्यांची संख्या सव्वा लाखांच्या घरात आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शासनाकडून शाळा बंद करण्यात आल्या होत्या. त्यामुळे मागील दोन वर्षांपासून विद्यार्थी घरीच होते. शहरी तसेच ग्रामीण भागातील काही वर्ग सुरू झाल्यानंतर पहिली पासूनचे वर्ग कधी भरणार अशी विचारणा पालकांतून होत होती. तर विद्यार्थी शाळेत जाण्यास उत्सुक आहे.
100 टक्के गुरुजींचे लसीकरण -
आजपासून जिल्हाभरातील पहिलीपासूनच शाळा सुरू होत आहेत. एकही गुरुजी लसीकरण विना राहणार नाही याची काळजी घेण्यात आली आहे. 100 टक्के सर्व शिक्षकांचे लसीकरण झाले आहे. एवढेच नाही तर प्रत्येक शाळेच्या स्वच्छतेवर ही भर दिला गेला आहे. त्यामुळे शाळादेखील आता स्वच्छ झालेल्या पाहायला मिळत आहे.
शाळा पाहणीसाठी पथकाची नेमणूक -
दरम्यान शिक्षण विभागाने मार्गदर्शक सूचनांचे स्वतंत्र पत्र देखील काढले आहेत. उपाययोजनांचे पालन होते की नाही हे पाहण्यासाठी शिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, विषयतज्ञ, साधन व्यक्ती यांची पथके तयार करण्यात आली आहेत. ही पथके शहरी तसेच ग्रामीण भागातील शाळांना भेट देणार असल्याचे शिक्षणाधिकारी डॉ. अरविंद मोहरे यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांमध्ये उत्साह तर शाळांनी सुरक्षेची खबरदारी घ्यावी, असे पालकांचे मत -
आता शाळा सुरू होणार आहेत. मागील दोन वर्ष ऑनलाइन शिक्षण झाले असले तरी प्रत्यक्षात शाळेत जायला मिळणार आहे. पहिलीत असतानाच्या मित्रांची भेट होणार आहे. त्यामुळे शाळेत कधी जाऊ, असे झाले आहे. अशी प्रतिक्रिया विद्यार्थी हसान खान याने दिली. तर दोन वर्ष विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र आता एकदाचे शाळा सुरू झाले आहे. त्यामुळे मुलांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून शाळांनी आवश्यक खबरदारी घेणे गरजेचे आहे, असे पालक इमरान खान यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना सांगितले.
मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्याचे जिल्हा परिषद अध्यक्षांचे आवाहन -
दोन वर्षानंतर पहिलीपासूनचे वर्ग सुरू होत आहे. कोरोनाचा संसर्ग ओसरला असला तरी धोका पूर्णपणे टळलेला नाही. त्यामुळे शासन स्तरावर देण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांचे तंतोतंत पालन व्हावे, यासाठी शिक्षण विभागासह शाळांनी शंभर टक्के प्रयत्न करावेत, असे जिल्हा परिषद अध्यक्षा अस्मिता कांबळे यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना सांगितले.
विद्यार्थ्यांचे झालेले नुकसान लवकरात लवकर भरून काढू : शिक्षक -
कोरोनाच्या काळात शाळा बंद मात्र ऑनलाइन शिक्षण सुरु होते. स्वाध्याय उपक्रम, पारावरची शाळा, मंदिरातली शाळा या विविध उपक्रमातून विद्यार्थ्यांना अध्ययन अध्यापनाच्या प्रक्रियेत ठेवण्याचा प्रयत्न झाला. परंतु प्रभावी अध्यापनासाठी वर्ग अध्यापन याला पर्याय नसल्यामुळे विद्यार्थ्यांचे खूप मोठ्या प्रमाणावर शैक्षणिक नुकसान झाले. हे शैक्षणिक नुकसान लवकरात लवकर भरून काढणे आणि covid-19 प्रतिबंधक सर्व नियमांची अंमलबजावणी करून शाळा कायम सुरू राहतील यासाठी प्रयत्न करणे या दुहेरी आघाडीवर मी आणि माझा प्रत्येक शिक्षक बांधवाला प्रयत्न करावा लागणार आहे. आणि नक्कीच आम्ही यात यशस्वी होऊ, असे प्रतिपादन शिक्षिका ढेपे यांनी केले.
हेही वाचा - Omicron Variant : नागपूर शहरातील प्राथमिक शाळा सुरू करण्याचा निर्णय लांबणीवर; ग्रामीण भागातील शाळा सुरू