उस्मानाबाद - शिवसेना नेते आदित्य ठाकरे हे उस्मानाबाद जिल्ह्याच्या दोन दिवसीय दौऱ्यावर आहेत. आदित्य ठाकरे आज जिल्ह्यातील उमरागा व लोहारा तालुक्यातील दुष्काळग्रस्त भागाच्या दौरा निमित्त आले होते. या दौऱ्यात आदित्य ठाकरे यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. सोबत येताना जनावरांसाठी खाद्य व मक्याचं लोणचे आणले आहे, असे म्हणत शेतकरी कर्ज माफी नको कर्ज मुक्ती हवी आहे. माफी ही गुन्हेगारांना असते, असे ठाकरे म्हणाले. संपूर्ण कर्जमुक्तीसाठी सेना आग्रही असल्याचेही त्यांनी सांगितले.
दुष्काळाला घाबरुन तुम्ही आत्महत्या करू नका. शिवसेना तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. मला शेती विषयी काही कळत नाही. मी शहरी बाबू आहे. मात्र, तुम्ही शिवसेनेला हाक दिली ती हाक ऐकून येथे आलो आहे, असेही ते म्हणाले.
उमरागा व लोहारा येथील शेतकऱ्यांच्या जनावरांना चारा व गावातील लोकांना पिण्याच्या पाण्याच्या टाकीचे वाटप शिवसेनेच्या वतीने करण्यात आले. या दौऱ्यात ठाकरे यांनी जेवळी, समुद्रवणी या गावांना भेट दिली.