उस्मानाबाद - जिल्ह्यातील एका तरुणाने माळरानावर आधुनिक पद्धतीने शेती करून, तब्बल 8 हजार फळझाडांची लागवड केली आहे. सचिन बिराजदार असे या तरुणाचे नाव आहे. बिराजदार हे तुळजापूर तालुक्यातल्या सिंदफळ गावातील रहिवासी आहेत. पारंपरिक पिकांना फाटा देत, त्यांनी त्यांच्या दहा एकर शेतामध्ये विविध फळांच्या 8 हजार झाडांची लागवड केली आहे.
सचिन बिराजदार हे कला शाखेचे पदवीधर असून, त्यांना शेतीची आवड होती. मात्र पारंपरिक पिकांमध्ये न अडकता काहीतरी नवीन करण्याचा त्यांनी निश्चय केला. त्यांनी युट्यूबच्या माध्यमातून शेतीविषयक विविध तंत्रज्ञानाची माहिती घेतली. आणि त्यांनी सेंद्रीय शेती करण्याचा निर्णय घेतला. बाजारात चंदन आणि सागवान याला चांगली मागणी असल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी 2017 मध्ये साग आणि चंदनाची शेती करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी आपल्या अडीचएकर शेतात चंदन आणि सागाची लागवड केली. सध्या या झाडांची उंची साधारणपणे 25 ते 30 फूट आहे. त्याचबरोबर त्यांनी आपल्या तीन एकर शेतामध्ये इस्राईलच्या तंत्रज्ञानानाप्रमाणे केशर आंब्याची लागवड केली. त्यांनी तीन एकर शेतामध्ये तब्बल दीड हजार अंब्यांच्या रोपाची लागवड केली आहे. त्यात त्यांनी अंतर पीक म्हणून शिंदीचे उत्पादन घेतले आहे.
शेतीच्या बांधावर लिंबुनीच्या झाडाची लागवड
ग्रामीण भागात शेती करताना साधारणपणे कुंपण नसते, मात्र आता आधुनिक पद्धतीने आणि फळ झाडे लावणारे शेतकरी सर्वप्रथम शेतीला तारेचे कुंपण करतात. यासाठी लाखो रुपये खर्च येतो. मात्र सचिन बिराजदार यांनी हा खर्च टाळत संपूर्ण शेतीच्या बांधावर लिंबुनीच्या झाडाची लागवड केली आहे. लिंबुनीचे झाड हे काटेरी असते. त्यामुळे कुठल्याही प्राण्यांना अथवा व्यक्तीला शेतात शिरता येत नाही. तसेच या झाडापासून मिळणारी लिंबे विकून बिराजदार लाखो रुपयांचे उत्पादन मिळवत आहेत. सचिन बिराजदार यांची संपूर्ण शेती झाडांनी व्यापून गेली आहे. ड्रॅगन फ्रुट, सिंधी, चंदन, मिलीया डुबिया, आंबा, नारळ अशा विविध फळझाडांची त्यांनी लागवड केली आहे. यातून भविष्यात लाखो रुपयांचे उत्पादन होणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
हेही वाचा - 'मराठा आरक्षण' न्यायालयात टिकवण्यात राज्य सरकार अपयशी - सुधीर मुनगंटीवार
हेही वाचा - पुणे- हायवा टिप्पर मागे घेताना दुचाकीला जोराची धडक; अंगावरून चाक गेल्याने दोन जण ठार