उस्मानाबाद - कळंब येथे पदवीधर मतदारसंघासाठी शांततेत सुरू असलेल्या मतदानप्रक्रियेला गालबोट लागले. येथे एका मतदाराने मतदान करतेवेळी व्हिडिओ तयार करून तो सोशल मीडियावर व्हायरल केला. हा प्रकार आज दुपारी घडला. या प्रकरणी जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.
जिल्ह्यात पदवीधर मतदारसंघासाठी 72 केंद्रावर मतदान प्रक्रिया झाली. यासाठी चोख पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला होता. तसेच, मतदान प्रक्रिया संदर्भातील मार्गदर्शक सूचनाही मतदान केंद्राच्या बाहेर लावण्यात आल्या आहेत. मात्र, तरीही कळंब येते गोपनीयतेच्या नियमाचा भंग करण्यात आला. मतदान केंद्रावर मोबाईल किंवा अन्य कोणतेही इलेक्ट्रॉनिक वस्तू नेण्यास प्रतिबंध असतानाही कळंब येथील मतदान केंद्रावर एका मतदाराने मोबाईल घेऊन मतदानाचा व्हिडिओ तयार केला व तो सोशल मीडियावर व्हायरल केला.
या व्हायरल व्हिडिओची तक्रार उस्मानाबाद जिल्हा अधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांच्यापर्यंत पोहोचली. जिल्हाधिकारी दिवेगावकर यांनी या प्रकाराची दखल घेत तातडीने संबंधित मतदारावर कारवाई करण्याचे निर्देश कळंब येथील उपविभागीय अधिकाऱ्यांना दिले आहेत.
हेही वाचा - पारंपरिक पिकांना फाटा देऊन तरुणाने मिळवले फळशेतीतून लाखो रुपयांचे उत्पन्न