उस्मानाबाद - कडकनाथ कोंबडी घोटाळ्यातील नुकसानग्रस्त उस्मानाबाद जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने मुख्यमंत्र्यांकडे इच्छा मरणाची परवानगीच मागितली आहे. अश्रूबा बिक्कड, असे या शेतकऱ्याचे नाव आहे. मागील अनेक दिवसांपासून याबाबत प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करुनही शासन कुठलाही ठोस निर्णय घेत नसल्याने बिक्कड यांनी ही मागणी केली आहे.
शेतीला जोडधंदा म्हणून सुरू केले कडकनाथ पालन व्यवसाय
शेतीला जोडधंदा म्हणून जिल्ह्यातील शेतकरी कडकनाथ कोंबडी पालनाकडे वळले होते. त्यासाठी शेतकऱ्यांनी कर्ज घेऊन हा व्यवसाय उभारला होता. मात्र, यात फसवणूक झाल्याचे शेतकरी सांगत आहेत. यामुळे बिक्कड यांच्या लहान मुलीने आपल्या वडिलांचा हा त्रास पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांकडे मांडला होता. त्यावेळी तत्कालीन जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांनी बिक्कड यांच्या घरी भेट देत लवकरात लवकर प्रश्न मार्गी लावणार असल्याचे सांगितले होते. मात्र, सहा महिने उलटूनही अद्याप कुठलीच कारवाई होत नसल्याने हे पाऊल उचलत असल्याचे बिक्कड यांनी सांगितले. न्याय द्या किंवा इच्छा मरणाची परवानगी द्या, अशी मागणीच आता बिक्कड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचेकडे केली आहे.
हेही वाचा - 'शॉर्टसर्किट'मुळे दीड एकरावरील ऊस जळून खाक, शेतकऱ्याचे अडीच लाखाचे नुकसान
हेही वाचा - शेजारच्यांकडून होणाऱ्या जाचाला कंटाळून शेतकऱ्याची जिल्हाधिकाऱ्याकडे आत्मदहनाची मागणी