उस्मानाबाद- जिल्ह्यातील परंडा तालुक्यातील सोनारी येथे भैरवनाथाचे मंदिर आहे. या देवस्थानाच्या परिसरात माकडांचा मोठा वावर आहे. मात्र, अज्ञात आजाराने या माकडांचा मृत्यू होत आहे. गेल्या 25 दिवसांपासून अंदाजे 30 माकडांचा मृत्यू झाला आहे.
हेही वाचा- अर्थसंकल्प २०२० : व्याजातून मिळणाऱ्या उत्पन्नावर अधिक सवलत देण्यावरून गोंधळ
या मंदिर संस्थेच्या परिसरात जवळपास तीन हजार माकडांचा वावर आहे. या माकडांचा दररोज मृत्यू होत असून आतापर्यंत 30 पेक्षा अधिक माकडांचा मृत्यू झाल्याचा अंदाज आहे. मंदिर परिसरात पाण्याचा कुंड आहे. या कुंडातील दूषित पाणी पिऊन माकडे मृत्यूमुखी पडत असल्याचा गावकऱ्यांचा अंदाज आहे. त्यामुळे कुंडातील पाणी काढून परत भरले आहे.
पशुसंवर्धन विभागाने या गावाला भेट देऊन मृत माकडांचा पंचनामा केला. त्याचबरोबर त्यांचे नमुनेही प्रयोगशाळेला पाठवले आहेत. जिल्ह्यातील दुष्काळामुळे 2012 या वर्षी या परिसरातील जवळपास 300 माकडांचा मृत्यू झाला होता. आत्ता परत माकडांचा मृत्यू होत असून गावकऱ्यांनी याबाबत चिंता व्यक्त केली आहे. मंदिर संस्थानाच्या दुर्लक्षतेमुळेच माकडांचा मृत्यू होत असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे.