उस्मानाबाद- अर्धा पावसाळा संपत आला तरीही जिल्ह्यातील धरणे आज घडीला कोरडी ठाक आहेत. लहान मोठी अशी सर्व धरणे मिळून जिल्ह्यात 223 प्रकल्प आहेत. समाधानकारक पाऊस न झाल्याने यातील 141 धरणे कोरडीठाक आहेत, तर 66 धरणांमध्ये मृत पाणीसाठा आहे. अत्यल्प पावसावर लावलेले पिक तग धरेल की नाही, अशी शेतकऱ्यांमध्ये चिंता आहे.
यावर्षीच्या पावसाळ्याचे दोन महिने उलटून गेले. मात्र या काळात दमदार पाऊस न झाल्याने विहिरी, विंधन विहिरी अद्यापही कोरड्या आहेत. जिल्ह्याची तहान भागवण्यासाठी प्रशासनाकडून 1046 विहिरी व कूपनलिका यांचे अधिग्रहण करून पाणीपुरवठा केला जात आहे. सध्या जरी रिमझिम पावसावर पिक हिरवेगार दिसत असले, तरी जास्त दिवस ते तग धरणारे नसल्याचे चित्र आहे. गेल्या वर्षीची अल्पदृष्टी आणि यावर्षीही पावसाने केलेले दुर्लक्ष, यामुळे शेतकरी चिंतेत आहे. आतापर्यंत पडलेल्या पावसामुळे थोडेबहूत खरिपाचे पीक हाती लागेल अशी शेतकऱ्यांना आशा आहे. मात्र, भविष्यात रब्बी पिकाला मुकावे लागेल की काय, अशी शेतकऱ्यांकडून भीती व्यक्त केली जात आहे.