नाशिक - लॉकडाऊन शिथील होताच नाशिकमध्ये गुन्हेगारीने पुन्हा डोके वर काढले आहे. नाशिकमध्ये गाड्यांची तोडफोड, खून, दरोडे याचे प्रमाण अधिक वाढल्याचे दिसत आहे. नाशिकच्या उपनगर हद्दीतील श्रीहरी लॉन्सच्या परिसरातील शेतामध्ये एका 22 वर्षीय युवकाचा मृतदेह आढळून आला. सागर अहिरे असे त्या युवकाचे नाव आहे. घातपातातून हा प्रकार झाला असल्याची प्राथमिक माहिती उपायुक्त विजय खरात यांनी दिली आहे. पुढील तपास उपनगर पोलीस करत आहेत.
शनिवारी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या दरम्यान एका व्यक्तीने श्रीहरी लाँन्सच्या परिसरात गोदावरी नदी काठालगत असलेल्या शेतामध्ये एक युवक मृतावस्थेत आढळल्याची माहिती पोलिसांना दिली. माहिती मिळताच उपआयक्त विजय खरात आणि उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील रोहोकले यांनी पोलीस कर्मचान्यांसह घटनास्थळी धाव घेतली. यावेळी पोलिसांना एका युवकच्या गळ्यावर काहीतरी तीक्ष्ण हत्याराने वार केल्याचे दिसून आले. ही घटना घातपातातून झाली असल्याचे पोलिसांच्यावतीने प्रथमदर्शनी सांगण्यात येत आहे. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.