नाशिक Youth Loses Vision By Laser Show : शहरात गणेश विसर्जनाच्या दिवशी आठ जणांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडल्यानं हळहळ व्यक्त करण्यात येत होती. त्यानंतर आता गणेश विसर्जन मिरवणुकीत पाच ते सहा युवक डीजेवरील लेझर शोचे शिकार झाल्याचं पुढं आलं आहे. लेझर किरण डोळ्यात गेल्यानं या युवकांची एका डोळ्याची दृष्टी कायमची गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नेत्ररोग तज्ज्ञांनी याचा खोलवर अभ्यास केला असता मिरवणुकीत ग्रीन लेझरची फ्रिक्वेन्सी खूप जास्त होती. युवक त्या लेझरच्या फ्रिक्वेन्सीच्या फोकल लेंग्थवर आलेत त्यांच्या डोळ्यांना गंभीर दुखापत झाली आहे. लेझर वापरावर बंदी आणण्याची गरज नेत्ररोग तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
गणेश विसर्जन मिरवणुकीत काय आहेत डॉक्टरांचे अनुभव : 'मी नेहमी प्रमाणं ओपीडीमध्ये नेत्ररोगाचे रुग्ण पाहू लागलो. थोड्या वेळात एक विशीतला तरुण दिसायला कमी झालं म्हणून आला. प्राथमिक तपासणी करुन बघितलं, तर त्याची नजर खूपच कमी झाली होती. मग त्याला नेत्रपटल तपासणीसाठी घेतलं. बघतो तर काय त्याच्या नेत्रपटलावर खूप मोठे रक्त साठले होते. नेत्रपटलावर भाजल्यासारख्या जखमा आढळल्या. नेहमीप्रमाणं वाटणारा हा आजार नव्हता, याची मला जाणीव झाली. मग फेर हिस्टरी तपासणीत त्याला विचारलं की काही मार लागला होता का? किंवा तू काही ग्रहण बघितलं का ? की कुठं वेल्डिंग बघितलं? तर त्यानं गणेश विसर्जन मिरवणुकीत नाचलो आणि डीजेवर लेसर शो बघितल्याचं सांगितलं. मग मनात पाल चूकचूकली आणि लेझर शोचा लेझर बर्न रेटिनावर असल्याची खात्री पटली. मग रेटिनाचा ओसीटी स्कॅन करुन माझं निदान कन्फर्म केलं. पुढील दोन तासात असेच आजून दोन रुग्ण आलेत, त्यांच्या पण डोळ्यांच्या रेटिनावर याच प्रकारचं चित्र दिसलं. याबाबत शहरातील नेत्ररोग तज्ज्ञांशी चर्चा केल्यानंतर पाच ते सहा जणांना लेझर शोमुळे डोळ्यांना गंभीर दुखापत होऊन त्यांची दृष्टी गेल्याचं समोर आलं. यातील बरेच जण अजून कदाचित रिपोर्ट झालेले नसतील किंवा दुसऱ्या डिस्ट्रिक्टचे असतील. हा आकडा याहून जास्त प्रमाणात असावा,' असा अंदाज नेत्ररोग तज्ञ डॉक्टर सचिन कासलीवाल यांनी सांगितलं..
म्हणून हे युवक शिकार झाले : गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये ठराविक युवकांच्या डोळ्यानां इजा का झाली, याचा खोलवर अभ्यास केला. यावेळी ग्रीन लेझरची फ्रिक्वेन्सी खूप जास्त होती आणि जे युवक त्या लेझरच्या फ्रिक्वेन्सीच्या फोकल लेंग्थवर आलेत किंवा त्यांचे नेत्रपटल आलेत तेच याचे शिकार झालेत. ज्या प्रकारे भिंग घेऊन ऊन्हात कागद पेटतो, तशाच प्रकारे या लेसरनं या तरुणाईच्या डोळ्यावर आघात केल्याचं डॉक्टर सचिन कासलीवाल यांनी सांगितलं.
न्यायालयाच्या आदेशाची उल्लंघन : सर्वोच्च न्यायालय, मुंबई उच्च न्यायालयानं देखील 2009 मध्ये ध्वनी प्रदूषणासंदर्भातील निर्देश दिले आहेत. सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये डीजेच्या डेसिबलवर मर्यादा घालून देण्यात आली आहे. मात्र यंदा गणेश विसर्जन मिरवणुकीत न्यायालयाच्या आदेशाचं उल्लंघन लोकप्रतिनिधींच्या आदेशानं होत आहे. ही अत्यंत गंभीर बाब आहे, असं याचिकाकर्ते वकील विलास देशमाने यांनी म्हटलं आहे.
डीजे मालकांवर गुन्हा दाखल : गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजे न लावण्याचं हमीपत्र देऊनही नाशिकच्या मुख्य मिरवणुकीत सहा व नाशिक रोडला एका मंडळांनी डीजे लावत नियमांचं उल्लंघन केलं. यात डीजे मालकांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात युवक मित्र मंडळ मुंबई नाका, शिवसेवा मित्र मंडळ, गाडगे महाराज पुतळा, रोकडोबा मित्र मंडळ, दंडे हनुमान मित्र मंडळ, युनायटेड फ्रेंड सर्कल, मालेगाव स्टँड मित्र मंडळ,साईराज फाउंडेशन मित्र मंडळ यांचा समावेश आहे.
हेही वाचा :