नाशिक - आईला कोरोना झाल्याचे समजताच 23 वर्षीय तरुणाने चिंतेतून गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना नाशिक येथे उघडकीस आली. आकाश मच्छिंद्र जाधव (रा.रोकडोबावाडी, नाशिक) असे मृताचे नाव आहे.
नाशिक जिल्ह्यात कोरोनाने थैमान घातले असून, दिवसेंदिवस बाधित रुग्णांचा आकडा वाढत आहे. नाशिक जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा 8 हजारांच्या पुढे गेला आहे. कोरोनामुळे आत्तापर्यंत 365 जणांचा बळी गेला आहे. एकट्या नाशिक शहरात 193 जणांचा मृत्यू झाला असून, वाढत्या रुग्णसंख्येमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आकाश जाधव या तरुणाच्या आईला कोरोनाची लक्षणे असल्याने उपचारासाठी दवाखान्यात दाखल करण्यात आले होते. त्यांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला होता. आकाश हा त्याच्या आईला भेटून घरी परतल्यावर त्याने घराचा दरवाजा लावून गळफास घेऊन आत्महत्या केली. बहीण घरी आली असता आकाश दरवाजा उघडत नसल्याने स्थानिक नागरिकांच्या मदतीने दरवाजा तोडण्यात आल्यावर घटना समोर आली.आकाशाला तत्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात नेण्यात आले मात्र, डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषीत केले. कोरोनाच्या कारणामुळे नाशिक जिल्ह्यातील ही तिसरी आत्महत्या आहे.