येवला : येवल्यातील युवा सेनेच्या वतीने तहसील कार्यालयाबाहेर नितेश राणे यांचा जाहीर निषेध करण्यात आला. भाजपचे नितेश राणे यांनी युवसेना सचिव वरूण सरदेसाई यांच्यावर बिनबुडाचे आरोप केले असून, या आरोपांमध्ये कुठल्या प्रकारची सत्यता नसल्याचे युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी यावेळी म्हटले. वरूण सरदेसाई यांची बदनामी करण्याचा कुटील डाव नितेश राणे करीत असून, वरूण सरदेसाई यांची बदनामी करणाऱ्या नितेश राणे यांच्याविरोधात तहसीलदारांना निवेदनही देण्यात आल्याची माहिती युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी दिली.
राणेंनी वरूण सरदेसाईंची जाहीर माफी मागावी..
नितेश राणे यांनी वरूण सरदेसाई यांची जाहीर माफी मागावी, अन्यथा येवला तालुका युवासेनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा यावेळी सारीभाई अन्सारी व इतर कार्यकर्त्यांनी दिला. यावेळी बापू गायकवाड, अरुण शेलार, शेखर शिंदे, सुनील शिंदे, शुभम झालटे, समाधान मिटके आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
काय आहे प्रकरण..
नितेश राणे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत शिवसेनेचे नेते वरूण सरदेसाई आणि सचिन वाझे यांचे आर्थिक गैरव्यवहार असल्याचा आरोप केला होता. या दोघांनी एकमेकांशी भरपूर वेळा संपर्क साधलेला होता आणि त्यांच्या सीडीआर चौकशीची मागणी आम्ही करत आहोत. त्यांची चौकशी एनआयएकडून व्हावी, अशी आमची मागणी असल्याचे असे नितेश राणे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले होते.