नाशिक(येवला) - येवला शहरातील एका पैठणी कारागिराने पैठणी साडीत वापरल्या जाणाऱ्या रेशमापासून विठ्ठलाची प्रतिमा साकारली आहे. जगदीश भालेरे, असे या कारागिराचे नाव असून त्याने आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठलाची प्रतिमा तयार केली. यासाठी जगदीशला चार दिवसांचा कालावधी लागला.
देशात व राज्यात असलेल्या कोरोना लॉकडाऊनमुळे पैठणी कारागिरांच्या हाताला सध्या काम नाही. पैठणी साडीच्या खरेदीसाठी ग्राहकच येत नसल्याने पैठणी कारागिरांवर बेरोजगारीची वेळ आली आहे. मिळालेल्या रिकाम्या वेळात जगदीशने रेशमापासून विठ्ठलाची प्रतिकृती साकारायला सुरुवात केली. आज आषाढी एकादशीच्या दिवशी त्याने आपली कलाकृती पूर्ण केली. आषाढीनिमित्त जगदीशने तयार केलेल्या या कलाकृतीचे येवल्यात कौतुक होत आहे.
जिल्ह्यातील येवला शहर पैठणी साड्यांसाठी जगप्रसिद्ध आहे. तेथील बहुतांशी नागरिकांचा रोजगार साडी व्यवसायावर अवलंबून आहे. विशेष करून उन्हाळ्यात लग्नसराई असल्याने पैठणीचा व्यवसाय तेजीत असतो. यावर्षी मात्र, कोरोना लॉकडाऊनमुळे लग्न सोहळे आणि पैठणी कारागिरांचे काम दोन्ही संकटात आले.