मनमाड - रोज अंकाई किल्ल्यावर ट्रेकिंगसाठी येणाऱ्या ट्रेकर्स व वृक्षप्रेमी तरुणांनी जागतिक योग दिनानिमित्त आज अंकाई किल्ल्यावर महंत ज्ञानेश्वर माऊली यांच्या नेतृत्वाखाली योगासने केली. तसेच किल्ल्यावर वड, बेल, चिंच यासह आयुर्वेदिक वृक्षांची लागवड केली आहे. मनमाड शहरासह येवला, नांदगांव, चांदवड तसेच नाशिक मालेगाव, धुळे, येथून देखील गिर्यारोहक व पर्यटक येथे संपूर्ण परिवारासह येतात.
लोक दररोज ट्रेकिंगसाठी किल्ल्यावर येतात
मनमाड-येवला रोडवर अगदी हाकेच्या अंतरावर अंकाई-टंकाई ही किल्ल्याची जोडगोळी आहे. या ठिकाणी अगस्ती मुनींचे मंदिर आहे. तसेच पुरातन काळातील किल्ला आहे. निसर्गाने येथे मुक्तपणे भरभरून देण दिले आहे. त्यामुळे अंकाई किल्ला हे पर्यटकांचे मुख्य आकर्षण आहे. काही लोक रविवारी तर काही लोक दररोज ट्रेकिंगसाठी या किल्ल्यावर येत असतात. मनमाड शहरासह येवला, नांदगांव, चांदवड तसेच नाशिक मालेगाव, धुळे, येथून देखील गिर्यारोहक व पर्यटक येथे संपूर्ण परिवारासह येतात.
औषधी वनस्पतींच्या झाडांची केली लागवड
आज येथील ट्रेकिंग गृप व वृक्षप्रेमींनी जागतिक योग दिनाचे औचित्य साधुन अगस्ती मुनी मंदिराचे महंत ज्ञानेश्वर माऊली यांच्या नेतृत्वाखाली योगा केला. त्यांनंतर वड, बेल, चिंच यासारख्या औषधी वनस्पतींच्या झाडांची लागवड केली. यावेळी महंत ज्ञानेश्वर माऊली यांनी योगा करण्याचे फायदे सांगितले. तर औषधी वनस्पतीची सर्वांनाच गरज भासते, त्यामुळे आपण राहतो त्या परिसरात जास्तीत जास्त झाडांची लागवड करण्याचे आवाहन केले. यावेळी महंत ज्ञानेश्वर माऊली, बाळू गोसावी, सुनील पवार, भिला वडगर, शकर अंजनवाड, संदीप वणवे, मुदसर शेख, सचिन रानडे, दत्तू शिंदे, स्वराज करकाळे, शिवा पाटील, प्रवीण वडगर, प्रदीप गायकवाड, महेंद्र बोरसे, लक्ष्मीकांत दरवडे आदीजन उपस्थित होते.
फिटनेससाठी रोज अंकाई किल्ल्यावर येतो...!
'रोजच्या धकाधकीच्या जीवनात दिवसभर ऑफिसचे काम, त्यानंतर इतर कामे करून आपल्याला आपल्या स्वतःसाठी वेळ काढणे शक्य होत नाही. त्यामुळे रोज सकाळी दीड तास स्वतःसाठी काढायचा हे ठरवून रोज अंकाई किल्ल्यावर येतो. यामुळे रोज सकाळी शुध्द हवा मिळते तसेच फिरणे देखील होते. आता अंकाई किल्ला परिसरात मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड करण्याचा आमचा मानस आहे', असे गिर्यारोहक सुनील पवार म्हणाले आहेत.
हेही वाचा - जागतिक योग दिन; योगासन आणि प्राणायामामुळे फुफ्फुसांची क्रियाशक्ती वाढते..