नाशिक - वडनेर-हांडोरे मळ्यामध्ये महापालिकेच्या वतीने ड्रेनेज टाकण्यासाठी खोदकाम करण्यात येत आहे. भूमिगत गटारीसाठी खोल खड्डे खोदले जात असून या खड्ड्यांमध्ये उतरून काम करताना वरच्या बाजूने टाकलेल्या मातीचा भराव अचानकपणे खड्ड्यात कोसळला. यामुळे ढिगाऱ्याखाली दोन मजूर अडकले. नाशिक रोड अग्निशामक उपकेंद्राच्या जवानांनी सर्व साधनसामुग्रीसह घटनास्थळी धाव घेत शर्तीचे प्रयत्न करून मजुरांना सुरक्षित बाहेर काढले आहे.
मातीचा खच खड्ड्यात पडल्याने अडकले होते मजूर -
नाशिकरोड परिसरात सध्या महापालिकेच्या वतीने ड्रेनेजची कामे करण्यात येत आहे. गुरुवारी नाशिक रोड परिसरातील वडनेर रोडवर असलेल्या हांडोरे मळ्यामध्ये ड्रेनेजचे काम होते भूमिगत गटारीसाठी काही मजूर या ठिकाणी खड्डे खोदण्याचे काम सुरू होते. याठिकाणी अचानकपणे मातीचा भराव खड्ड्यात कोसळल्याने मातीच्या ढिगाऱ्याखाली दोन मजूर अडकून पडल्याची घटना घडली. हांडोरे मळा येथे मनपाच्या भूमिगत गटार टाकण्याचे काम सुरू आहे.
सिमेंटचे पाइप खोल खड्ड्यात टाकत असताना सुमारे 15 फूट खोल खड्डा खोदण्याचे काम मजुरांना करावे लागते. हेच काम सुरू असताना खोद कामातून निघालेल्या मातीचा भराव अचानकपणे खड्ड्यात पडल्यानं हे मजूर त्याखाली दबले गेले होते. दरम्यान, इतर मजुरांच्या लक्षात ही बाब आल्याने त्यांनी तातडीने नाशिक रोड अग्नीशमन दलाला पाचारण करण्यात आले. जवानांनी जवळपास दोन तास शर्थीचे प्रयत्न केल्यानंतर या मजुरांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले आहे.
हेही वाचा - शेतात जाण्यास रस्ता नसल्यानं हेलिकॉप्टरची सोय करा, शेतकऱ्याचे थेट राष्ट्रपतींना पत्र
दोघे मजूर किरकोळ जखमी ; अग्निशमन दलाच्या प्रयत्नांनी वाचले मजुरांचे प्राण
खड्ड्यात अडकल्याने पप्पु आंबोरे आणि मंगेश गावांदे हे दोघे मजूर जखमी झाले होते. तसेच जुन्या ड्रेनेजच्या पाईपमधून पाण्याची गळती होत असल्याने याठिकाणी निर्माण झालेल्या दुर्गंधीमुळे या मजुरांना श्वास घेण्यास देखील त्रास होत होता. यामुळे त्यांना खड्यातून बाहेर काढल्यानंतर त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून त्यांना नाशिकरोड भागातील एका खासगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.