सटाणा( नाशिक) - देवळा तालुक्यातील देवपुरपाडे येथे आज पहाटे पाच वाजता चोरीच्या उद्देशाने एका महिलेचा खून झाला आहे. ही घटना समजताच परिसरात खळबळ उडाली आहे. शेजारी राहणाऱ्या बाप-लेकांनीच महिलेवर कुऱ्हाडीने हल्ला केल्याची माहिती समोर येत आहे. या हल्ल्यात मृत महिलेचा मुलगाही गंभीर जखमी झाला आहे. जिजाबाई विजय जोंधळे (वय ५०) असे मृत महिलेचे नाव आहे.
मृताचा मुलगा संदीप विजय जोंधळे (वय २७) हा या हल्ल्यात जखमी झाला आहे. संदीप जोंधळे याच्या डोक्यात कुऱ्हाडीचा वार लागल्याने त्याला गंभीर दुखापत झाली आहे. देवळा ग्रामीण रुग्णालयात त्याच्यावर प्राथमिक उपचार केल्यानंतर त्याला मालेगाव येथे हलविण्यात आले.
या घटनेप्रकरणी संशयित आरोपी अरुण बाबुराव गांगुर्डे (५१), कमलेश अरुण गांगुर्डे (२३), अंकलेश अरुण गांगुर्डे (१९), विमलबाई अरुण गांगुर्डे (३९) (सहआरोपी) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, अधिक तपास देवळा पोलीस करत आहेत.