नाशिक - धरणांचा तालुका अशी ओळख असलेल्या इगतपुरीतील अनेक गावांना ( Water scarcity Igatpuri ) सध्या भीषण पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. अनेक गावांतील महिलांना हंडाभर पाण्यासाठी ( Water Scarcity In villages ) मोठी कसरत करावी लागत आहे. याच तालुक्यातील कथृवांगन पाड्यावर महिलांना ( Water scarcity in Kathruwangan Pada ) सकाळपासून पाण्याच्या शोधासाठी बाहेर पडावे लागत आहे. दोन ते चार किलोमीटर पायपीट केल्यानंतर कसेबसे हंडाभर पाणी मिळते. शिवाय संकलन केलेला पाणीही पिण्या योग्य नसल्याने महिलांची मोठी निराशा होते. त्यामुळे शासनाने या पाड्यांवर पाण्याची व्यवस्था करुन देण्याची मागणी महिला व गावकरी करत आहेत.
पंधरा दिवसात एक वेळा मिळतं पाणी : इगतपुरी नगरपरिषद मोठ्या थाटामाटाने २४ तास पाणीपुरवठ्यासाठी भावली धरण पाणी योजना सुरु करत आहे. परंतु दुसरीकडे कृथवांगन हा पाडा इगतपुरी नगरपरिषदेचे हद्दीत येतो. २७ वर्षांपूर्वी या पाड्याचा समावेश नगरपरिषदेत करण्यात आला. परंतु पाण्याची परिस्थिती जैसे थे आहे. या पाड्यात एकूण ४५ घरे आहेत. ज्यात जवळजवळ दोनशे लोक राहतात. पाणीपुरवठ्याच्या नावाखाली नगरपरिषदेने सात वर्षांपूर्वी दोन नळ कनेक्शन दिले. जवळच एका जुन्या टाकित हे पाणी साठवले जाते. पंधरा दिवसात एक वेळा जास्तीत जास्त वीस मिनिटे पाणी पुरवठा केला जातो, असे येथील आदिवासी बांधवांचे मत आहे. पण सध्या तेही मिळत नसल्याचे गावकरी सांगतात.
लोकप्रतिनिधींचेही दुर्लक्ष : मागील काही दिवसांपासून येथे तळेगाव येथील विहिरीतून पाणी सोडण्यात येते. मात्र हे पाणी गढूळ, कधी उंदिर किंवा साप मेलेले पाणी पुरविण्यात येत असल्याचे तेथील महिला सांगतात. लोकप्रतिनिधींना ही बाब सांगूनही ते लक्ष देत नसल्याचे महिला सांगतात. सध्या पाड्यावरिल स्त्रिया दोन किलोमीटर रेल्वेरुळ ओलांडून पाणी आणतात. महामार्गावरुन पायपीट करत, जीवावर खेळत हे पाणी आणत आहे. आदिवासी बांधवांकडे प्रशासनाने लक्ष्य द्यावे, अशी मागणी स्थानिकानी केली आहे. मागणी मान्य न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा आदिवासी बांधवांनी दिला आहे.
हेही वाचा - BMC has Taken pre Monsoon Measures : मुंबईची तुंबई होऊ नये म्हणून पालिकेने केल्या 'या' उपाययोजना