नाशिक - गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरू आहे. सकाळी गंगापूर धरण 98 टक्के भरले आहे. त्यामुळे गंगापूर धरणातून 3 हजार 500 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येत असल्याने गोदावरी नदीच्या पाण्याची पातळी वाढली असून गोदावरी नदी काठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
गोदावरी नदीच्या पाणी पातळीत वाढ रविवारपासून (दि. 12 सप्टेंबर) गंगापूर धरणातून 1 हजार 530 क्युसेक पाण्याचा विसर्ग केला जात होता. दरम्यान, सोमवारी (दि. 13 सप्टेंबर) सकाळी नऊ वाजता पाण्याचा विसर्ग वाढवून 2 हजार 500 क्युसेकवर नेण्यात आला. त्यानंतर दुपारी पुन्हा हा विसर्ग वाढवून 3 हजार 500 क्युसेक करण्यात आला आहे. परिणामी गोदावरी नदीला पहिल्यांदाच पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होणार असून नदी काठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. याबरोबरच जिल्ह्यातील दारणा धरणातून 10 हजार 60 क्युसेक पाण्याचा विसर्ग होत आहे. कडवा धरणातून 2 हजार 200 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. आळंदी धरणातून 30 क्यूसेस तर वालदेवीतून 183 क्युसेक पाण्याचा विसर्ग होत आहे. तर नांदूरमध्यमेश्वर बंधाऱ्यातून 16 हजार 582 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू असून पाणी जायकवाडीच्या दिशेने जात आहे.
हेही वाचा - ...अन् शेतकऱ्यांनी दीड एकरमधील मिरचीची शेती केली उद्ध्वस्त