नाशिक : राज्यातील अनेक भागात अवकाळी पावसाने कहर माजवला आहे. तसेच मागील वर्षी पावसाळ्यात देखील चांगला पाऊस झाला होता. असे असताना सुद्धा नाशिक जिल्ह्यातील नागरिकांना पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे. जिल्ह्यातल्या पेठ तालुक्यातील दाभाडी गावातल्या महिलांना पाण्यासाठी डोंगर उतरून 2 किलोमीटरपर्यंत पायपीट करावी लागते आहे. येथे पाण्याची किती वणवण आहे, याची प्रचिती या व्हिडिओमधील भली मोठी रांग पाहून लक्षात येईल. दाभाडी गावात दोन विहिरी आहेत. पण या दोन्ही विहिरींमध्ये पाण्याचा एकही थेंब नाही. यामुळे या गावातील महिलांना डोंगर उतरुन पायथ्याशी असलेल्या विहिरीतून हंड्याने पाणी आणावे लागत आहे.
जंगली प्राण्याची भीती : पाणी आणताना वाटेत महिलांना वाघ, तरस, रानडुक्कर या वन्य प्राण्यांचा धोका देखील आहे. दरम्यान, वन्य प्राण्यांनी महिलांवर हल्ला केल्याच्या काही घटना देखील घडल्या आहेत. या गावातील पुरुष मंडळी कामासाठी बाहेर गावी जात जातात. त्यामुळे या महिला घरी एकट्या असतात. त्यामुळे घरात कुठलीही परिस्थिती असो, अगदी या महिला गर्भवती असल्या तरी त्यांच्याकडे स्वत: जाऊन पाणी भरण्याशिवाय पर्याय नसतो.
पाण्याची समस्या लवकर सोडवण्याची मागणी : गावात दोन विहिरी आहेत, मात्र त्यात पाणी नसल्याचे गावच्या सरपंचांनी सांगितले. पाणी आणायला जाताना महिलांना खूप त्रास होतो. त्यामुळे प्रशासनाने लवकरात लवकर जल जीवन योजना राबवून नागरिकांची ही समस्या सोडवावी. तसेच जे कंत्राटदार काम करण्यास तयार नाहीत त्यांना कंत्राट न देता दुसऱ्यांकडे काम देऊन पाण्याचा प्रश्न सोडवावा, अशी मागणी येथील सरपंच नामदेव कृष्णा देवाल यांनी केली आहे.
शासनाची फक्त घोषणा : पेठ तालुक्यातील दाभाडी गावातील महिलांना हंडाभर पाण्यासाठी डोंगराचा रस्ता पार करावा लागतो आहे. यामुळे शासनाकडून राबविण्यात येणारी जल जीवन योजना फक्त घोषणाचं रहिल्याचं दिसून येत आहे. या योजनेच्या अंतर्गत कोणतेच काम झालेले नाहीये. पेयजल व स्वच्छता विभागाच्या आकड्यानुसार आतापर्यंत 18.33 टक्क्यांपेक्षा जास्त ग्रामीण भागातील कुटुंबांना पाण्याची सुविधा पुरविण्यात आली आहे. परंतु नाशिक जिल्ह्यातील दाभाडी गावाची ही स्थिती पाहिल्यानंतर या आकड्याविषयी शंका उपस्थित होते.
मोदी सरकारचं महाराष्ट्राकडे दुर्लक्ष : केंद्रातील मोदी सरकार महाराष्ट्राकडे दुर्लक्ष करते, असा आरोप राज्यातील विरोधी पक्ष करत असतो. विरोधकांची हा आरोप हे दृश्य पाहिल्यानंतर खरा वाटू लागतोय. काही राज्यात या योजनेच्या अंतर्गत 90 टक्के कामे झाल्याचं सांगण्यात येतं. लेह लडाख सारख्या उंच प्रदेशात 13,800 फुट उंचावरील डेमचोक गावात पाईप लाईन करून पाणी पुरविण्यात आले आहे. मात्र नाशिक जिल्ह्यातील दाभाडी गावाचा पाणी प्रश्न का सुटत नाहीये, हा प्रश्न अद्यापही अनुत्तरीत आहे.
हेही वाचा : Rohit Pawar : रोहित पवारांवर पक्ष सोपवणार मोठी जबाबदारी? राज्यात चर्चांना उधाण